झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!
पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी झाडावर चढून बसत झाडे न तोडण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. ते म्हणाले की, पुणे शहरात विकास कामांना आमचा विरोध नाही. पण विकास काम करत असताना, पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासन थोडा विचार करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.
नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर पुणे महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यावर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या नदी पात्रात झाडांचे देखील तेच होणार आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यावरण प्रेमींनी यावेळी दिला.
प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.
यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे , नितीन कदम , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते , कैलास मकवान , विक्रम जाधव , हरीश लडकत , फईम शेख, शिल्पा भोसले इ प्रमुख उपस्थित होते.