भाजपचे नेते राष्ट्रवादीत येणे झाले सुरु
: नगरसेविका शीतल सावंत यांचे पतिंचा राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला जात होता. या चर्चा सुरू असतानाच भाजपच्या नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. “गेल्या पाच वर्षांत भाजपकडून निधी मिळाला नाही. तसेच कोणताही सन्मान मिळाला नाही. त्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत,’ असे सावंत यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सावंत यांनी हा प्रवेश केला. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश करून घेण्यात आला. “भाजपचे 16 नव्हे, तर 25 जण राष्ट्रवादीत येतील’ असा दावा आमदार टिंगरे यांनी केला आहे. राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक म्हणून सावंत यांची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत सावंत यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यानंतर आता नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची सुरूवात सावंत यांच्या प्रवेशाने झाल्याची राजकीय चर्चा आहे.
COMMENTS