Naval Kishore Ram IAS | कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्त लावून त्यांची काळजी घेणारे आणि पर्यायाने शहराची काळजी घेणारे महापालिका आयुक्त नवल किशोर राम!
Pune Devlopment – (The Karbhari News Service) – काही वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वचक निर्माण करतात. यामुळे कर्मचारी, अधिकारी त्यांच्याकडे एखादी फाईल घेऊन जाण्यासाठी देखील कचरतात. काही अधिकारी कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित मानतात. काही अधिकाऱ्यांना फक्त स्वतःचे हित महत्वाचे वाटते, शहराच्या हिताचे त्यांना काही घेणेदेणे नसते. काही अधिकारी शहरातील मोजक्याच लोकप्रतिनिधीना जवळ करतात. मात्र एखादा अधिकारी असा असतो जो कुणाकडे दुर्लक्ष करत नाही. सर्वाना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मुख्य म्हणजे शहराचे हित पाहतो. असा आदर्श अधिकारी म्हणून पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पहिले जात आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे ते दैवत तर झालेच आहेत, मात्र पुणे शहरासाठी आणि महापालिकेचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी असा अधिकारी हवा आहे, अशी भावना शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक देखील व्यक्त करू लागले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिल्यामुळे आयुक्तांना शहराची चांगली ओळख होती. म्हणूनच आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर त्यांनी शहरात पहाटेच फेरफटका मारून शहर अजून जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले, काम कशा पद्धतीने करायला हवे आहे ते. शिवाय त्यांच्या हे देखील लक्षात आले कि, आपले अधिकारी आणि कर्मचारी हे कामचुकारपणा करतात. त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यानुसार आयुक्तांनी शहराचा फेरफटका मारत कमर्चारी आणि अधिकाऱ्यावर कारवाई करत त्यांना निलंबित देखील केले. हे करतच त्यांनी सातत्त्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा लावला. यामुळे काही अधिकाऱ्यांनी नाके मुरडली. मात्र मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे करणे गरजेचे आहे, हे आयुक्तांना माहित होते. म्हणून त्यांनी राजकीय दबाव येऊन देखील आपल्या निर्णयात बदल केला नाही. त्यामुळे आता महापालिका कामकाजात पारदर्शकता येऊ लागली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जो मनमानी कारभार चालत होता, त्याला वचक बसला आहे. प्रत्येक टेंडर बारकाईने तपासले जात आहे. महापालिकेचा हा कारभार सुधारल्याने आपसूक शहर सुधारणेची घडी बसली आहे. काम करायला अजून वाव आहे, मात्र ही सुरुवात चांगली आहे.
कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या आयुक्त यांच्याविषयी बऱ्याच तक्रारी असतात. काही लोक नाराज असतील देखील. मात्र बहुसंख्य कर्मचारी हे आयुक्तांना देव मानू लागले तर कुठला लोकप्रतिनिधी देखील आता उघडपणे आयुक्त यांच्याविषयी नाराजी बोलून दाखवत नाही.. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत आयुक्तांनी काही कठोर निर्णय घेतले, पण कर्मचारी हे माझे आहेत, अशी आपुलकी दाखवत त्यांना न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला. हे फक्त कायम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नाही तर कंत्राटी कामगारांना देखील न्याय दिला आहे. माझे कर्मचारी आणि माझे शहर, असा भाव ठेवून आयुक्त कामकाज करत आहेत, हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे काही घेतले आहेत महत्वाचे निर्णय!
१ – कंत्राटी कामगारांना बोनस
बाह्यस्त्रोताद्वारे पुणे महानगरपालिकेच्या कामासाठी घेतलेल्या कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियमातील तरतुदीनुसार वेतन दिले जात होते व त्यामध्ये तरतूद असल्याने कंत्राटी कामगारांना संबंधित ठेकेदारामार्फत बोनस, रजावेतन, व घरभाडे भत्ता अदा करण्यात येत होता. २०२१ पासून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियमाद्वारे वेतन देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे व किमान वेतन अधिनियमात बोनस, रजावेतन व घरभाडे भत्ता इत्यादी देण्याची तरतूद नाही. तसेच बोनस प्रदान अधिनियम १९६५, महाराष्ट्र दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियम तसेच महाराष्ट्र किमान घरभाडे अधिनियम १९८३ याधील तरतुदी पुणे मनपास (स्थानिक स्वराज संस्था) लागू नसल्याने कंत्राटी कामगारांना बोनस, रजावेतन व घरभाडे भत्ता दिला जात नाही. असे म्हटले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
२ – सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दीडपट वेतन
पुणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्य सणांच्या सुट्टीच्या दिवशी सफाई कामगारांकडून काम करून घेतल्यास त्यांना आर्थिक मोबदला म्हणून त्या दिवसाचे दीडपट वेतन दिले जाणार आहे. याबाबत कामगार कल्याण विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या बैठकीत मान्यता दिली आहे. सफाई कामगारांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
३ – कामावर असताना मृत्यू झाल्यास ५ लाख
पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कामावर असताना कुठल्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कामगार कल्याण विभागाने ठेवलेल्या प्रस्तावाला नुकतीच धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्या प्रती महापालिकेचे असलेले उत्तरदायित्व लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
४ – गृहकर्जाच्या अटीत सुधारणा
पुणे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या घरबांधणी अग्रिम प्रकरणी अटी व शर्ती सुधारित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कर्मचारी आणि अधिकारी पुणे जिह्यात कुठेही घर किंवा जागा घेऊ शकणार आहेत. पूर्वी ही अट पुणे मनपा हद्दीपासून फक्त ५ किमी अंतरापर्यंत होती. याबाबत कामगार कल्याण विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे.
५ – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना CHS चा लाभ
पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना (PMC Employees) सेवानिवृत्त झाल्यावर तत्काळ अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेचा (CHS) लाभ दिला जात नव्हता. पेन्शन (PMC Pension) सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना योजनेच्या कार्ड साठी रखडत बसावे लागते. मात्र आता कर्मचाऱ्यांना या योजनेचा सेवानिवृत्त झाल्यावर देखील तत्काळ लाभ मिळणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारातून १ टक्का रक्कम घेतली जाणार आहे. २००५ नंतर निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिली.
६ – नियम महत्वाचा नाही तर शहराचे हित महत्वाचे
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विकास विभागाच्या वतीने शहरात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. दरम्यान काही भागात या आधी कारवाई झाली नाही मात्र आता जोरदार कारवाई झाली आहे. शिवाय या बाबत महापालिका अधिकारी पत्रकारांना दमदाटी ची भाषा करतात याबाबत पत्रकारांनी महापालिका आयुक्त यांना छेडले. यावेळी महापालिका आयुक्तांनी इशारा दिला कि शहरातील कुठलाही भाग असो किंवा कुणाचेही अतिक्रमण असो शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अतिक्रमण कारवाई अधिक कडक केली जाणार आहे. आमच्याकडे तक्रार आली की आम्ही कारवाई करणार आहोत. आयुक्त म्हणाले की, शहराचे हित साधण्यासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही नियम पाळत बसलो तर शहराचे हित साधण्यासाठी खूप वर्ष जातील. त्यामुळे नियमांचा विचार न करता आम्ही अतिक्रमणवर कारवाई करणार आहोत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची कामकाजाची पद्धत ही सर्वच क्षेत्रातील लोकांना भावली आहे. महापालिकेचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी आणि शहराचा विकास साधण्यासाठी अशी सकारात्मकता खूप महत्वाची असते. महापालिका आयुक्त त्यांचे काम तर जोमाने करतच आहेत. मात्र आपल्या शहरासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील लोकांसोबत नागरिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

COMMENTS