Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार
Pune – New Delhi – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्विकारण्यापूर्वी मोहोळ यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेत मार्गदर्शन घेतले. राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारताना विभागाचे केंद्रीय सचिव डॅा आशिष कुमार भूटानी यांची उपस्थिती होती. शिवाय शाह यांनी सहकार मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा मोहोळ हे त्यांच्या समावेत होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर मोहोळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शाह यांचे अभिनंदन केले. (Murlidhar Mohol Pune)
कार्यभार स्वीकारल्यावर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांकडून कामाबद्दल माहिती घेत चर्चाही केली. कार्यभार स्वीकारल्यानंतर मोहोळ यांनी सांगितले की, ‘भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते, हे वारंवार सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सहकार मंत्री अमित शाह जी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग महाराष्ट्रातील आणि देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी करण्याचे ध्येय ठेवले आहे. सहकार क्षेत्राबद्दल सामान्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम प्राधान्याने करायचे आहे.
ते पुढे म्हणाले, केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर सहकाराबद्दल आणखी विश्वास वाढवण्याचे आणि सहकाराची वृद्धी करण्याचे काम सुरु असून महाराष्ट्राच्या दृष्टीने हे मंत्रालय अतिशय महत्त्वाचे आहे. सहकाराची पाळेमुळे देशाच्या ग्रामीण भागात पसरली असून या मंत्रालयामार्फत ग्रामीण जनतेसाठी काम करता येईल, याचे मोठे समाधान आहे.
मोहोळ यांनी पदभार स्विकारण्यापूर्वी सहकार मंत्री शाह यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छांची दिल्या. यावेळी शाह यांनी शुभेच्छांचा स्विकार करत मोहोळ यांच्या पाठीवर थाप टाकत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.