MSEDCL | Vivek Velankar | गेल्या पाच महिन्यांपासून महावितरणने विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केलेले नाहीत | महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा कधी होणार!
MSEDCL – (The Karbhari News Service) – वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द करणे आवश्यक आहे. यातून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे समजते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर जानेवारी २०२४ नंतर हे निर्देशांक गेल्या पाच महिन्यांपासून प्रसिद्ध केलेले नाहीत. महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा कधी होणार, असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
वेलणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, या आधी सुध्दा तक्रार केल्यानंतर महावितरणने निर्देशांक प्रसिद्ध केले होते . महावितरणने जे स्वतः हून करायचे आहे त्याकरीता दर वेळेस तक्रार करावी लागणे दुर्दैवी आहे. आणि तक्रार केल्यानंतर काही तासांत तीन तीन महिन्यांची माहिती प्रसिद्ध होते , म्हणजे याचाच अर्थ ती तयार असते पण त्यातून महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असल्याने ती माहिती प्रसिध्द करण्याचे टाळले जाते.
उदाहरणच द्यायचे झाले तर महावितरणच्या संकेतस्थळावर जी शेवटची म्हणजे जानेवारी २०२४ ची माहिती प्रसिद्ध आहे , ती अभ्यासली असता असे दिसते की जानेवारी २०२४ या संपूर्ण महिन्यात राज्यात वीज खंडीत होण्याच्या १३००१ घटना घडल्या ज्यामध्ये महाराष्ट्रातील सव्वा दोन कोटी ग्राहकांना एकूण २३४३४ तास अंधारात बसावे लागले. देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुणे विभागातील परिस्थिती सुध्दा वाईटच आहे. जानेवारी २०२४ या महिन्यात पुणे विभागात वीज खंडीत होण्याच्या ६८७ घटना घडल्या ज्यामध्ये पुण्यातील जवळपास बावीस लाख ग्राहकांना एकूण १४९६ तास अंधारात बसावे लागले. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या ६ वर्षांचे निर्देशकांचे चार्ट उपलब्ध आहेत ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्ती साठी आठवड्यातून एक दिवस ( पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार आणि ग्रामीण भागातील भारनियमनामुळे होणारा अंधार वेगळाच.
आपल्याला विनंती आहे की महावितरणला नियमाप्रमाणे दरमहा हे निर्देशांक प्रसिध्द करण्यास भाग पाडावे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे या निर्देशांकातून समोर येणार्या महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा होण्यासाठी पावले उचलण्यासाठी त्यांना बाध्य करावे. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.