Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

HomeBreaking Newsपुणे

Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ganesh Kumar Mule Mar 29, 2023 2:29 PM

Modern College Pune | मॉडर्न महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
PM Narendra Modi | हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन | नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. २९ : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अशोक पवार, माधुरी मिसाळ, रवींद्र धंगेकर, राहुल कुल, श्रीकांत भारतीय यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या कुटुंबातले घटक, अजातशत्रू खासदार गिरीश बापट सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. ते सर्वसामान्यांचे नेते होते. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपला माणूस वाटत होते. अनेक आंदोलनातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. नगरसेवक, महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, पाचवेळा विधानसभेवर आमदार आणि त्यानंतर लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले.

स्व. बापट यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान मंत्री म्हणून काम केले. त्यांनी आपली कारकीर्द, प्रत्येक भूमिका प्रचंड यशस्वी केली. अजातशत्रू अशा व्यवहारामुळे विधानमंडळ चांगला कारभार चालवला. नागरी पुरवठा मंत्री म्हणून पहिल्यांदा राज्यात संपूर्ण रेशन कार्डांचे आधार जोडणी करून १ कोटी बोगस रेशन कार्ड शोधून काढले आणि नवीन १ कोटी गरिबांना रेशन देण्याचे काम केले. त्यांच्या जीवनाच्या पानाशिवाय पुण्याचा इतिहास पुढे जाऊ शकणार नाही. तब्येत खराब असतानाही त्यांनी लढाई कधीच सोडली नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. बापट यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. बापट यांचे सुपुत्र गौरव बापट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि लोकसभा अध्यक्ष यांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. स्व. बापट यांना श्रद्धांजली देण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, रमेश बागवे, माजी खासदार संजय काकडे, अमर साबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, उल्हास जोशी, नरेंद्र पवार, शरद ढमाले, आशिष देशमुख यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
000