Moshi Garbage Depot Incident | मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू

Homeadministrative

Moshi Garbage Depot Incident | मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू

Ganesh Kumar Mule Jul 09, 2026 7:58 PM

Pimpari Chinchwad Police | पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण
PMC – PCMC Election | पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका  निवडणूक साठी पीएमपीएमएल च्या १०५६ बसेस | प्रवाशांची काही प्रमाणात होणार गैरसोय
Pimpari Chinhwad Congress | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चिंचवड विधासभेवर दावेदारी

Moshi Garbage Depot Incident | मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्यात आतापर्यंत ९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आज (दि. ९) सकाळी शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या एका नागरिकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अद्यापही आठ नागरिकांचा शोध घेण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. (Moshi Incident News)

मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजता कचऱ्याचा ढीग प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने दुर्घटना घडली. त्यावेळी इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक होते. यापैकी अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे पाच नागरिक सुरुवातीलाच सुखरूप बाहेर पडले. उर्वरित १८ नागरिक इमारतीत अडकल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल , भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने बचावकार्य सुरू केले.

बुधवारी रात्रीपर्यंत सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह या सहा नागरिकांना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्यात विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत या आणखी तीन नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली. अशा प्रकारे बचावकार्यात एकूण नऊ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या श्वान पथकाच्या मदतीने सुरू असलेल्या शोध मोहीमे दरम्यान आज सकाळी सुमारे ९ वाजता भावेश वाणी यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

सध्या घटनास्थळी अद्याप अडकलेल्या अंदाजे आठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. तसेच आज खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्यासंदर्भात माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: