परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे
पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे शिवाजीनगर येथील कामांसंदर्भात तसेच वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. याला आज मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.
श्री. भुसे म्हणाले की, शिवाजीनगर येथील एसटीचे बसस्थानक मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यालगत वाकडेवाडी येथील शासकीय दुग्ध योजनेच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजीनगर बसस्थानकाची जागा मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत महामेट्रोला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली असून यासाठी महामंडळ आणि महामेट्रो यामध्ये करार झाला आहे. येथील स्थानिक रहिवाशांसाठी वाकडेवाडी येथून डिसेंबर 2019 पासून बसस्थानक आणि आगार सुरळीत चालू असून जुन्या पुणे मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसेस सुरु आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी ‘जुने शिवाजीनगर’ बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक तयार करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात 3 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक झाली असून आता पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचे, मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
०००