लंपी चर्मरोगाचा धोका टाळण्यासाठी पुणे महापालिकेकडून उपाययोजना
पुणे – लंपी चर्मरोगाचा (Lumpy skin disease) धोका वाढत असल्याने पुणे महापालिकेनेही(pune municipal corporation) प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गाय, बैल यांच्या वाहतुकीस बंधने घालण्यात आले आहेत. तसेच बाधित जनावरांमुळे आराजाचे संक्रमण होऊ नये यासाठी वैरण व इतर साहित्य बाजूला ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्राण्यांची जत्रा, प्रदर्शने यावरही बंदी घालण्यात आली आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी या संदर्भात आज (बुधवारी) आदेश काढले आहेत. राज्यात सात सप्टेंबरपर्यंत १७ जिल्ह्यांमधील ५९ तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगामुळे गोजाती प्रजातीतील २५ गुरांचा मृत्यू झाला आहे. हा रोग वेगाने पसरत आहे. पुण्यातही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते, खासगी मालकांचे गोठे आहेत. त्यामुळे लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या भागात या रोगाची लागण झालेली नाही तेथे प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी करावी, असे असे पालिकेच्या परिपत्रकात नमूद केले आहे.
असे आहेत आदेश
– महापालिका हद्दीमधील गोपालक पशुपालक गोरक्षण संस्था व दुग्ध व्यावसायिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
– गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, नियंत्रित क्षेत्रातील गोठ्याबाहेर नेण्यास बंदी करण्यात आली आहे.
– बाधित जिवंत किंवा मृत जनावरांना नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेता येणार नाहीत.
– बाधित प्राण्यांच्या संपर्कातील वैरण, अन्य गवत व अन्य साहित्य, अशा प्राण्यांचे शव, कातडी अथवा प्राण्यांपासून बनलेले कोणतेही उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेता येणार नाहीत.
– गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा बाजार भरविण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
– प्राण्यांची जत्रा भरविणे,प्रदर्शन आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही.
– नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाधित प्राण्यांना आणण्यास बंदी असेल.
– या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी केली जावी.