जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज
: पुणेकरांच्या दबावाने पाणी कपात रद्द : महापौर
पुणे : पुण्याच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची वेळ घेऊन पाच वाजता सिंचन भवन येथे गेलो, तासभर वाट पाहिली. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट पत्रकार परिषदेला गेले. त्यामुळे मी सिंचन भवन येथून निघून आलो. माझ्या वैयक्तीक कामासाठी नाही तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्वकल्पना देऊन भेटण्यासाठी गेलो होते. तरीही भेट झाली नाही, ’’ अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली याचे आम्ही स्वागत करतो, असे मोहोळ म्हणाले. जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमध्ये मला जायचे नाही, पण दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्याने आदेश काढून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करणार असल्याचे सांगितले. तरीही पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नव्हता असे मंत्री सांगत आहेत. हे राजकारण सुज्ञ पुणेकर बघत आहेत. भामा आसखेडचे पाणी मिळाले म्हणून खडकवासल्याचे पाणी कपात केले जात आहे, यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा काय संबंध. वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याची टीका मोहोळ यांनी केली. दरम्यान, पाटील यांनी ‘‘महापौर मला कशासाठी भेटणार आहेत हे माहिती नाही, पत्रकार परिषद संपल्यानंतर मी त्यांना भेटेल असा खुलासा केला. तर जयंत पाटील यांच्या खुलाशानंतर महापौरांनी या प्रकरणातून माघार घेतली. असा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. तर महापौर म्हणाले कि पाण्यात राजकारण आणू नये, ही आमची इच्छा आहे.
COMMENTS