Marathi Bhasha | अभिजात दर्जानंतर मराठीसाठी सर्वांनी काम करणे महत्त्वाचे
Viswha Marathi Sammelan 2025 – (The Karbhari News Service) – मराठीला अभिजात दर्जा पूर्वसंचितामुळे मिळाला आहे. मात्र आता पुढील वाटचाल सर्वांना मिळून करावी लागणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञानाची कास धरून मराठी भाषेचे भविष्य घडणार असल्याचा सूर ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केला. (Pune News)
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विश्व मराठी संमेलनात ‘माझी मराठी अभिजात झाली’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहभाग घेतला. भूषण करंदीकर यांनी संवाद साधला.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हीदेखील एक भाषाच आहे. मोठ्या कंपन्या एआयसाठी प्रचंड गुंतवणूक करतात. तशी गुंतवणूक झाल्यास मराठीसाठीही काम करता येईल. लोकांच्या मनात प्रमाणभाषेविषयी अढी आहे. ही अढी दूर होत नाही तोपर्यंत मराठीचा विकास होणार नाही. अभिजात भाषेमध्ये भर टाकली पाहिजे. त्यासाठी जागतिक पातळीवर मान्य झालेले इतर भाषांतील शब्द मराठीत स्वीकारणे हा उपाय आहे.
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, अमेरिका, इस्रायल, इंग्लंड, मॉरिशस या चार देशांमध्ये मराठीची मुद्रा अधिक चांगली आहे. परदेशातील मराठीजन मराठी भाषेविषयी सजग आहेत. परराज्यांतील मराठी लोक तहानलेले आहेत. आता महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र आणि परदेशातील महाराष्ट्राकडे गांभीर्यामे पाहिले पाहिजे. मराठी साहित्याच्या अनुवादासाठी परदेशातील मराठीजन मदत करू शकतात. त्यासाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे.
डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, साहित्य भाषेचे वहन करण्याचे माध्यम आहे. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. बोलीभाषा, ग्रामीण भाषेतील साहित्य श्रेष्ठ असते. मराठी साहित्याचा अनुवाद इतर भारतीय भाषा, परदेशी भाषांमध्ये होत नाही या बाबतीत मराठी मागे आहे. कसदार साहित्याचा परिघ पुण्यामुंबईकडून उर्वरित महाराष्ट्रात जात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. शाळा-महाविद्यालयात मराठीच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मराठीचे अध्यापन खंडित होते. मराठी टिकून राहण्यासाठी सरकारी स्तरावरूनही विचार होण्याची गरज आहे.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मराठी ही रोजगाराची भाषा होण्यासाठी ती ज्ञानाची भाषा व्हावी लागेल. आधुनिक ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान मराठीत आले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकांना सहन होत नाही. आता अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीत मिळू लागले आहे. येत्या काळात अन्य अभ्यासक्रम मराठीत निर्माण होतील. नवे तंत्रज्ञान भाषेसाठी वापरले पाहिजे. तर भाषा तरुणांची होईल. साहित्यिक, तंत्रकुशल लोकांनी भाषेसाठी योगदान दिले पाहिजे. सर्व शाळांमध्ये सक्तीने शिकवण्याच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होते का, याची तपासणी झाली पाहिजे. तसेच मराठी शाळांमध्ये उत्तम पद्धतीने इंग्रजी शिकवले पाहिजे.
मधु मंगेश कर्णिक म्हणाले, मराठीच्या अडीच हजार वर्षांच्या संचितावर मराठी अभिजात झाली. पण आजच्या व्यवहारातील मराठी अभिजात आहे का, उद्याची मराठी कशी असेल याची भीती वाटते. मराठीविषयी आस्था आहे म्हणून मंत्री भाषेच्या उद्धाराविषयी बोलतात. मराठीच्या विकासाचा समग्रपणे करण्याचा विचार सरकारने केला पाहिजे. सरकार मोठमोठे रस्ते, पूल बांधते. पण मराठी भाषेकडे उरलासुरला निधी देऊ नये. मराठीच्या सरकारी संस्थांना भरभक्कम निधी दिला पाहिजे. सरकारनेही आमच्याबरोबर काम केले पाहिजे. भाषा प्राधिकरण स्थापन केले पाहिजे.
COMMENTS