Marathi Bhasha Gaurav Din | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन संपन्न
Annasaheb Wagire College Otur – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे २७ फेब्रुवारी २०२५रोजी जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे व मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली. सदर कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभहस्ते करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले. (Education News)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.वसंत गावडे म्हणाले,”मराठी भाषेचा इतिहास दैदीप्यमान आहे. वर्तमान काळात ती अनेक आव्हाने पेलत मार्गक्रमण करत आहे. भविष्यकाळात ती जगातील एक समृद्ध भाषा व ज्ञानभाषा नक्कीच होईल. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेली आहे”
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे व व्याख्याते डॉ.शाकुराव कोरडे ‘अभिजात मराठी भाषा’या विषयावर बोलताना म्हणाले,”मराठी भाषेचा प्राचीन वसा आणि वारसा आपण जतन- संवर्धन केला पाहिजे. तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार आपण ज्ञानभाषे पर्यंत नेला पाहिजे. संत,पंत आणि तंत यांनी मराठी भाषा समृद्ध केली. त्या भाषेचे उतराई आपण झाले पाहिजे.”
अध्यक्षीय मनोगतात डॉ.कल्याण सोनावणे म्हणाले,”मातृभाषा ही आपली जन्मभाषा आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. आपण मराठी साहित्यातील वेगवेगळ्या लेखकांचे अनेक साहित्य प्रकार वाचले व अभ्यासले पाहिजेत.”
या प्रसंगी अर्णव बेनके या विद्यार्थ्यांने कुसुमाग्रजांची माहिती देऊन त्यांची कणा ही कविता म्हटली. कु.युवराज्नी सोनवणे हिने मराठीचा गौरव करणारी स्वरचित कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी तिला प्रचंड प्रतिसाद दिला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात भव्य मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.तसेच दि.१४ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान संपन्न झालेल्या भाषा पंधरवडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध, प्रश्नमंजुषा, हस्ताक्षर, घोषवाक्य, कथा,अभिवाचन, काव्यवाचन,कविता लेखन, वक्तृत्व या स्पर्धेतील विजेत्यांना पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी डॉ. छाया तांबे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.राजेश रसाळ, डॉ. रमाकांत कस्पटे,डॉ रमेश काशीदे, डॉ. विनायक कुंडलीक, डॉ.किशोर काळदंते, यांनी मोलाचे सहकार्य केले. आभार डॉ.रोहिणी मदने यांनी मानले. सूत्रसंचालन कु.सायली अहिनवे या विद्यार्थिनीने केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS