Make In India | मेक इन इंडियाची पोकळ भाषा नको | मोदी सरकारने लघु उद्योजकांना तातडीने सबसिडी चालू करावी | माजी आमदार मोहन जोशी
Mohan Joshi Congress – (The Karbhari News Service) – ‘मेक इन इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’ अशी फसवी भाषा मोदी सरकारने बंद करावी आणि सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकांना १५ टक्के सबसिडी तातडीने चालू करावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारकडून लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योजकांना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी १५ टक्के सबसिडी दिली जात होती. लघु उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी या सबसिडीतून हातभार मिळत होता. गेल्या दोन वर्षांपासून अचानकपणे सबसिडी बंद केल्यामुळे या उद्योजकांसमोर भांडवल उभारणी आणि अन्य कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी तातडीने दूर करण्याची गरज आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच राज्य सरकारकडून सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकांना मिळणाऱ्या ५ टक्के सबसिडीत वाढ करावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.
केंद्र सरकारने विशेषतः मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’ अशा घोषणा दिल्या, मोठमोठी भाषणे दिली. जाहीरातबाजी केली. पण, मोदी यांच्या अनेक योजना अनेक योजना पोकळ ठरल्या त्याप्रमाणे लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या घोषणाही फसव्याच ठरल्याची टीका मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे. लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योजकांना अनुदान चालू व्हावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS