Mahavikas Aghadi on PMC Ward Structure | पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना की, प्राणी संग्रहालयातील वेगवेगळ्या प्राण्यांचे छायाचित्र ? – अरविंद शिंदे यांचा सवाल
PMC Election 2025 -(The Karbhari News Service) – महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग रचेनेच्या खुलाश्यांसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर परिषदेस काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सदर पत्रकार परिषद पार पडली. (Pune Municipal Corporation – PMC)
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या नियमावलीनुसार प्रभाग रचना होणे अपेक्षित असते. परंतु वरील अनेक नियमावलीतील नियमांचे उल्लंघन आगामी पुणे मनपा निवडणुकीतील प्रभाग रचना तयार करताना केले गेल्याचे निदर्शनास आले आहे. तसे की, प्रभाग रचना करताना नदी, नाले, मुख्य रस्ते यांसारख्या नैसर्गिक सीमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. वेडेवाकडे प्रभाग आखल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयी निर्माण होतील.
काही प्रभागांमध्ये मागासवर्गीय वस्त्यांची जाणीवपूर्वक विभागणी करण्यात आली आहे. या मागचा उद्देश म्हणजे त्या प्रभागात मागासवर्गीय समाजाला आरक्षण लागू पडू नये. ही बाब सामाजिक न्यायाला धक्का पोहोचवणारी आहे. भाजपा माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्या प्रभागात अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण पडलेले नाही.
काही प्रभाग चार वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून भाग घेऊन तयार केले गेले आहेत. यामुळे प्रशासकीय सुसूत्रतेचा अभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केलेली आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना आहे की, प्राणी संग्रहालयातील वेगवेगळ्या प्राण्यांचे छायाचित्र? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
जाहिर केलेल्या प्रभाग रचनेची एकंदरीत स्थित पाहता ती पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या राजकीय हस्तक्षेपाने तयार करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने या आधी पुणे मनपा आयुक्त मनवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. असे शिंदे यांनी सांगितले.
सदर पत्रकार परिषदेस आ. बापूसाहेब पठारे, मा. आ. दिप्ती चवधरी, गोपाळ तिवारी, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, अजित दरेकर, मेहबुब नदाफ आदी उपस्थित होते.

COMMENTS