Maharashtra News | राज्याच्या उत्पादनक्षमतेत भर घालणारी रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Homeadministrative

Maharashtra News | राज्याच्या उत्पादनक्षमतेत भर घालणारी रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Ganesh Kumar Mule Apr 17, 2025 9:23 PM

Pune Congress | महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयारीनिशी सज्ज | भाजपचा भ्रष्टाचार आणि पुण्याची दैना याविरोधात मते मागणार
Education Fee | ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार
Unseasonal Rain in Maharashtra | 27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra News | राज्याच्या उत्पादनक्षमतेत भर घालणारी रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

Shivendrasingh Raje Bhosale | औद्योगिक क्षेत्रे, विमानतळ, बंदरे, पर्यटनस्थळे आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. (Maharashtra Road)

सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे तुषार बुरुड, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह विभागातील कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

राज्यात औद्योगिक गुंतवणूक, परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात काम करीत आहे, असे सांगून मंत्री श्री. भोसले म्हणाले, राज्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी रस्त्यांचे जाळे वाढणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून नवनवीन रस्ते प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार रस्ते, इमारतींच्या कामांचे लक्ष्य गाठतानाच त्यांची गुणवत्ता, अधिकार क्षेत्रातील इमारतींची स्वच्छता, व्यवसायस्नेही वातावरण निर्मिती आदींवर लक्ष द्यावे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे पुनुरुज्जीवन करण्याबाबत टप्प्याटप्प्याने काम हाती घ्यावयाचे आहे, या किल्ल्यांना रस्त्यांची जोडणी करायची असून पर्यटक अधिक काळ तेथे थांबतील यादृष्टीने पायाभूत सुविधा व आकर्षणकेंद्रे निर्माण कशी करता येतील याबाबत अभ्यास करावा. पर्यटन हा मोठा रोजगार देणारा उद्योग असून राज्यात या क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यासाठी महत्त्वाची पर्यटनस्थळे मोठ्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक असून त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

रस्ते, सार्वजनिक इमारतींची कामे करताना त्यांच्या दर्जाला सर्वाधिक महत्त्व द्यावे. त्यासाठी नियमित संनियंत्रण करावे. रस्त्यांच्या कडेला, इमारतील वृक्षारोपणासाठी येथील हवामानात वाढणाऱ्या स्थानिक प्रजातींना महत्त्व द्यावे. सातारा जिल्ह्यातून महाबळेश्वर येथे आणि कोकणात जाताना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करावे, असे निर्देशही श्री. भोसले यांनी दिले.

यावेळी मुख्य अभियंता श्री. चव्हाण यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विभागाचा आढावा दिला. रस्त्यांचे खड्डे असल्यास त्याची माहिती विभागाला कळविण्यासाठी ‘पॉटहोल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस)’ हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून विभागाच्या संकेतस्थळावर, अँड्रॉईड प्ले-स्टोअर तसेच भारत सरकारच्या एमसेवा पोर्टलवरदेखील ते उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.

बैठकीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू येथील समाधीस्थळ आणि तुळापूर बलिदान स्थळ विकास आराखड्यातील कामांचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सद्यस्थितीत ‘हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल अर्थात हॅम’, आशियाई विकास बँक (एडीबी), नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी योजना तसेच अर्थसंकल्पित निधीतून सुरू असलेली रस्ते, पुलांची कामे, भविष्यातील नियोजन, सुरु असलेल्या इमारतींची कामे, नाविन्यपूर्ण योजना आदींबाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले.

पुणे शहरातील तसेच शिक्रापूर, चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित महत्त्वाकांक्षी असा शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता तसेच लोणावळा येथे प्रस्तावित सार्वजनिक बांधकाम प्रशिक्षण व संशोधन प्रबोधिनीबाबत सादरीकरण करण्यात आले.