Maharashtra MLC Election | विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

HomeBreaking Newssocial

Maharashtra MLC Election | विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

गणेश मुळे May 30, 2024 3:38 AM

Mukhymantri Yojanadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
Maharashtra News | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 1 लाखाच्या मदतीची कार्यवाही सुरु
NCP – Sharadchandra Pawar Manifesto | देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे | शरद पवार यांची ‘शपथनामा’ मधून भाजप वर सडकून टीका 

Maharashtra MLC Election | विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

 

Maharashtra MLC Election- (The Karbhari News Service) – भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (MLC Election) जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे पर्यंत त्या लेखी स्वरुपात मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांना सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम (S Chokkalingam IAS) यांनी येथे केले.

मंत्रालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत श्री.चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती संबंधितांना दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सहनिवडणूक अधिकारी मनोहर पारकर यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दि.७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. या निवडणुकीकरिता शुक्रवार, ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार, १० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जूलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि.२४ मे २०२४ रोजी या निवडणूकीसाठीचे प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. हे प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून तात्काळ संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. मुबंई पदवीधर तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग, हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त, नाशिक तर मुबंई शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

या विधान परिषदेच्या निवडणूकांकरिता अंतिम मतदार यादी दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापर्यंत दि.७ जून २०२४ पर्यंत या यादीमध्ये सुधारणा करता येईल. त्यासाठी या दिनांकापूर्वी दहा दिवस आधी म्हणजे दि. २८ मे २०२४ पर्यंत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील. दि.१ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात मुंबई मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार १४,५१५ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही १,४०४ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ रोजीची एकूण मतदारसंख्या १५,९१९ इतकी आहे. यामध्ये मुंबई शहर २,७४८ मतदारसंख्या तर मुंबई उपनगरमध्ये १३,१७१ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये मुंबई मतदारसंघात एकूण मतदार संख्या १०,१७० इतकी होती.

नाशिक मतदार संघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ६४,८०२ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही १,७५५ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची एकूण मतदारसंख्या ६६,५५७ इतकी आहे. यामध्ये नाशिक २४,९६५ मतदारसंख्या तर धुळे ८,१६५, नंदुरबार ५,४९५, जळगांव १३,११४, अहमदनगर १४,८१८ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये नाशिक मतदारसंघात एकूण मतदार संख्या ५३,८९२ इतकी होती.

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मुंबई मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या ९१,२६३ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही २५,६६० इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची एकूण मतदारसंख्या १,१६,९२३ इतकी आहे. यामध्ये मुबंई शहर मध्ये ३१,२२९ तर मुबंई उपनगरमध्ये ८५,६९४ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची मुंबई या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही ७०,५१३ इतकी होती.

कोकण मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या १७,७५१० इतकी असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही ३६,४०७ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यत रोजीची एकूण मतदारसंख्या २,१३,९१७ इतकी आहे. यामध्ये पालघर मध्ये २५,११५ तर ठाण्या मध्ये ९५,०८३, रायगडमध्ये ५३,५४३, रत्नागिरी २२,२०५, सिंधुदुर्ग १७,९७१ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही १,०४,४८८ इतकी होती.

राज्यसभेवरील रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडणुकीबाबत

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल,राज्यसभा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने दि. २७ मे २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्राद्वारे निवडणूक कार्यक्रम घोषित केला आह. दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे पद रिक्त झाले असून या पदाचा कालावधी दि. ४ जूलै, २०२८ पर्यंत होता.या रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरवार, दि. ६ जून २०२४ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक), नामनिर्दैशन पत्र दाखल करण्याचा अतिम दिनांक दि.१३ जून, २०२४, गुरवार आहे. दि.१४ जून २०२४, शुक्रवार रोजी नामनिर्दैशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि.१८ जून, २०२४, मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहील.

मतदानाचा दिनांक २५ जून, २०२४ मंगळवार असून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. दि.२५ जून मंगळवार रोजी सायं.५ वा. मतमोजणी केल्या जाईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, दि. २८ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या निवडणूकीसाठी जितेंद्र भोळे, सचिव, (१) प्रभारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी दिली.

0000