Mahabudget | राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल विरोधी पक्षांना काय वाटते?

HomeBreaking Newsपुणे

Mahabudget | राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल विरोधी पक्षांना काय वाटते?

Ganesh Kumar Mule Mar 09, 2023 2:01 PM

Jejuri Fort Development Plan | जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
Mahabudget | शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प | भाजपकडून अर्थसंकल्पाचे कौतुक
BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | भाजपचे पुण्यातही  घर चलो संपर्क अभियान

 विरोधी पक्षांना बजेट बद्दल काय वाटते?

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. याबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई पाठोपाठ राज्यातील सर्वाधिक महसूल पुणे शहरातून जमा होतो. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे मेट्रोतील नवीन मार्ग यांनाही पुरेशा निधीची तरतूद न करता केवळ वाटण्याच्या अक्षता दाखविन्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गत वर्षी सादर केलेल्या अनेक योजनांची नावे बदलून त्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरावर अन्यायकारक असा अर्थसंकल्प आहे.

– सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

—— 

“पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या बजेट ने केले आहे”

राज्याचे अर्थमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेले हे पहिलेच बजेट आहे. पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यासाठी बंडखोर आमदारांचा विचार करून मांडलेले हे बजेट आहे.

या बजेट मधून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला काहीही मिळालेले नाही. पुणे शहर व पुणे जिल्ह्याचा विचार करता पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखवण्याचे काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. आज झालेले बजेट पाहता, नुकत्याच कसबा विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवातून देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी काहीही बोध घेतलेला नाही असे यातून दिसून येते.

– प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

——-

अंगणवाडी ताईंच्या मानधनात तुटपुंजी वाढ, एस. टी महामंडळाच्या दुरावास्थेकडे सपसेल दुर्लक्ष, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार, वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना पेट्रोल, डिझेल, गॅस वरील टॅक्स मध्ये एक छदाम ही या सरकारने कमी केलेला नाही. पुणे शहराच्या गरजा लक्षात घेऊन या सरकारने या शहरातील विविध विकास कामांना प्राधान्य द्यायला हवे होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूकीत प्रचाराला येऊन मोठं मोठ्या घोषणा केल्या होत्या त्या सर्व घोषणाचा अर्थसंकल्पात सरकारला सोईस्कर विसर पडलेला दिसतोय. हे सरकार पडतंय कां टिकतंय हे या सरकारलाच माहित नसल्यामुळे निव्वळ घोषणांचा पाऊस पण प्रत्यक्ष लोकांना कोणताच दिलासा नाही असा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर झाला.

– सोनाली मारणे, सचिव.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


राज्याचा अर्थसंकल्प फक्त आकडेवारी देऊन फुगा तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न होता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले कुठलीही भरीव मदत शेतकरी बांधवांना मिळालेली नाही तसेच जुन्या पेन्शन योजनेचा गंभीर मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिलेले नाही शेतकऱ्यांना कुठलीही भरीव मदत झालेली नाही दत्तक घेतलेल्या नाशिकला अर्थमंत्र्यांनी दुर्लक्षित ठेवले हे अत्यंत दुर्दैवी आहे.

– *आकाश छाजेड*
अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) आणि
अध्यक्ष, नाशिक शहर काँग्रेस कमिटी


बोलाचाच भात अन बोलाचीच कडी…

शिंदे – फडणवीस सरकारने शेती आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आज सादर केला आहॆ. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या थातूर मातूर मलम पट्टीमुळे शेतकऱ्यांच्या विज बिल माफिबद्दलचे देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन लोकं विसरतील ही यांची अपेक्षा दिसतेय. शेतकरी विज बिलाबद्दल अवाक्षर ही नाही. शेतकऱ्यांना लुटून खाजगी कंपन्याची तुंबडी भरणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजनेतून या कंपन्यांपुढेच या अर्थसंकल्पात सरकारने लोटांगण घेतलं आहॆ. नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प आहॆ. 75 हजार नोकर भरतीबद्दल या अर्थसंकल्पात साधा उल्लेख ही नाही, बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारचा मी निषेध करतो.

– हनुमंत पवार, प्रवक्ता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


असंघटित कामगारांसाठी महामंडळ तयार करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती परंतु त्याचे अंमलबजावणी झालेली नव्हती आता नव्याने पुन्हा एकदा सरकारने त्याचीच घोषणा केली आहे निधी मात्र कोणत्याही त्यासाठी जाहीर केलं नाही कशा पद्धतीची निर्मिती असणार या संदर्भातही काही भाष्य सरकारने केलेले नाही सध्या अस्तित्वात असलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ निधी अभावी 2014 सालापासून आजपर्यंत त्याचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे त्याचबरोबर माथाडी मंडळ राज्यामध्ये विविध ठिकाणी आहेत त्या मंडळातील कर्मचारी स्टाफ हा उपलब्ध नाही त्यामुळे तिथले काम अतिशय मंद गतीने चालू आहे त्यासाठी नोकर भरतीची घोषणा गरजेचं होतं परंतु त्या संदर्भातली कुठली घोषणा नाही एकंदरीतच सगळी नव्याने उदयास येत असलेल्या खूप मोठ्या प्रमाणावरच काम क्षेत्र आहे ज्या कामगार क्षेत्राला कोणताही कामगार कायदा लागू नाही त्यांची उपेक्षाच या सरकारने केली आहे

– सुनील शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस

——

राज्याला दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – पृथ्वीराज चव्हाण

: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती नाही. शेतीसाठी ठोस तरतूद नाही, आरोग्य, शिक्षणाकडेही अपेक्षित फोकस नाही त्यामुळे अत्यंत निराशाजनक व दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केले.

यापुढे बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काल सादर केलेला आर्थिक पाहणी अहवाल एक चिंताजनक स्थिती प्रस्तुत करतो. महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर हा पहिल्यांदाच देशाच्या आर्थिक विकासदराच्या खाली गेलेला आहे. आतापर्यंतची परंपरा आहे कि, आपला राज्याचा आर्थिक विकासदर हा देशाच्या आर्थिक विकसदरापेक्षा ४ ते ५ टक्के तरी अधिक असतो. जर आपण महाराष्ट्राला देशाचं आर्थिक इंजिन मानतो तर आज महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पाचव्या क्रमांकावर गेलेलं आहे, हि चिंताजनक बाब आहे. तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू हि राज्ये आपल्या पुढे गेलेली आहेत. ती परिस्थिती बदलण्याकरिता काहीही उपाययोजना नाहीत.

आज शेतकऱ्यांना सरकारकडून दोनच महत्वाच्या अपेक्षा असतात एक म्हणजे पिकवलेल्या धान्याला किफायतशीर मोबदला व हमीभावाचा शाश्वती आणि दुसरा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारकडून योग्य ती भरपाई. पण या दोन्हीबाबतीत सरकारचे जैसे थे धोरण आहे. राज्यातला शेतकरी सरकारकडे आसा लावून बसला आहे. कारण दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणतेही घोषणा आज सरकाकडून झालेली नाही. सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार शेतकऱ्याला खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते. परंतु त्याबद्दल राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाही.

कालच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार कृषी व उद्योग आर्थिक विकासदर हा मंदावलेला दिसतो. राज्य सरकार फक्त सामंजस्य कराराची यादी जाहीर करते पण त्या कंपन्या राज्यात आल्या कि नाही याबाबत कोणतेही भाष्य केले जात नाही. अनेक मोठे उद्योग शेजारच्या राज्यात हायजॅक केले आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या PLI योजनेअंतर्गत किती हायटेक नवीन उद्योग आपल्या राज्यात आले?

केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार गेल्या ४५ वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी आपल्या देशात आहे म्हणजे ती परिस्थिती आपल्या राज्यात सुद्धा आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही. आज राज्य सरकारमध्ये २ लाख ३० हजार पदे रिक्त आहेत पण सरकारने आज पुन्हा ७५ हजार पद भरतीची घोषणा केलेली आहे. त्या कधी पूर्ण करणार आहेत याचे ठोस नियोजन दिसत नाही.

उद्योगांच्या बाबतीत सामंजस्य कराराबाबत सरकार सांगत आहे पण त्यामधील किती उद्योग आपल्याकडे गुंतवणूक खरंच करणार आहेत याची कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, किंवा जे उद्योग आपल्या राज्याला सोडून बाहेरच्या राज्यात जात आहेत त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिसत नाही. त्यामुळे माझा चिंतेचा विषय आहे कि, महाराष्ट्राला पुन्हा नंबर एक वर आणण्यासाठी कोणतेही ठोस उपाय या सरकारने राबविलेले दिसत नाहीत.

मुंबईचे महत्व कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरात ला पळविले गेले, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.

आजच्या अर्थसंकल्पात बऱ्याच लोकप्रिय घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेल्या आहेत पण त्या सर्व घोषणा फसव्या आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर होईल अशी घोषणा केली आहे. हि अत्यंत फसवी आणि बोगस घोषणा आहे. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५०० बिलियन म्हणजे अर्धा ट्रिलियन करू अशी घोषणा केली होती आणि आता १ ट्रिलियन डॉलर ची घोषणा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वाढ फक्त वार्षिक ६.८% इतकी असेल तर आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी किती कालावधी जाईल ? मग ती २०२७ पर्यंतच करायची असेल तर आपला विकासदर किती हवा ?

या सरकार बद्दल राज्याच्या जनतेत जी प्रचंड नाराजी आहे त्याचे पडसाद त्यांना गेल्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा-विधानपरिषद निवडणुकांवरून समजून आलेले आहे ते वातावरण बदलायचं हा प्रयत्न आहे. प्रत्येक समाज घटकाला खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, परंतु हा प्रयत्न अत्यंत फसवा आहे हे जेव्हा जनतेला समजेल तेव्हा जनता या सरकारचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. महापुरुषांची स्मारके करण्याच्या घोषणेला नक्कीच टाळ्या मिळाल्या असतील पण अशा स्मारकांकरिता जागा, समिती, त्याचे डिझाईन या सर्व गोष्टी पूर्ण व्हायला किमान २ वर्षाचा वेळ लागतो. शिवछत्रपतींचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा होऊन १० वर्षे झाली तरी त्याची एक वीट रचलेली आपल्याला दिसत नाही. यामुळे राज्यातील जनतेला फसव्या आणि दिशाभूल घोषणांपेक्षा ठोस आणि जनहिताचे निर्णय सरकारकडून अपेक्षित होते.