Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

HomeBreaking Newsपुणे

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

गणेश मुळे Apr 22, 2024 3:03 PM

Dr Chandrakant Pulkundwar IAS | विभागीय आयुक्तांची मतमोजणी केंद्रांना भेट!
International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
Vidhansabha Election | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

 

Loksabha Election Voting – (The Karbhari news Service) – अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश देण्यासाठी रेखाटलेल्या भित्तीपत्रक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय कला प्रसारिणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, भारतीय कला प्रसारिणीचे पृथ्वीराज पाठक, प्राचार्य राहूल बळवंत उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना मताधिकार मिळाल्याने मतदानाचा दिवस हा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता यावे व पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद तरुण पिढीमध्ये असून नवमतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.पुलकुंडवार यांनी कलेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला मतदानाचे आवाहन करणारे संदेश दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या मनात निश्चितपणे मतदान करण्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दिवसे म्हणाले, कला हे प्रभावी माध्यम असल्याने कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचविता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलली भित्तीपत्रके मतदारजागृतीसाठी उपयुक्त ठरतील. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांतून मतदानाचा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचेल. अन्य माध्यमांचा उपयोग करून ही कलाकृती विविध शासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सजग नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगून प्रत्येक पात्र मतदाराने येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय कला प्रसारणीचे श्री. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.