Lokmanya Tilak Award 2025 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान!

HomeBreaking News

Lokmanya Tilak Award 2025 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान!

Ganesh Kumar Mule Aug 01, 2025 8:41 PM

CM Devendra Fadnavis | महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PMC Additional Commissioner | पुणे महापालिकेला रिक्त जागांवर दोन अतिरिक्त आयुक्त लवकरात लवकर मिळावेत!
Pune University Flyover | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण!

Lokmanya Tilak Award 2025 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान!

 

Nitin Gadkari – (The Karbhari News Service) – नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ त्यांना प्रदान करणे हा एका कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्वाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. (CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, माजी मुख्यमंत्री तथा ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ.गीताली टिळक, डॉ. प्रणति टिळक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकमान्य टिळकांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण आहे. लोकमान्यांचा हा बाणा नितीन गडकरी यांच्या अंगी ठायी-ठायी दिसतो. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे त्यांचे नेतृत्व आहे. विलक्षण प्रतीभा त्यासोबत संवेदनशीलता आणि सातत्याने समाजकारणाची प्रेरणा देणारे संस्कार त्यांनी जोपासले आहेत. ते चांगले संशोधक आहेत. कृषी, अभियांत्रिकी, वैद्यक, उद्योग, स्थापत्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट आहे. नवनवीन बाबींकडे ते आकृष्ट होतात. या बाबी सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचता येतील असा त्यांचा प्रयत्न असतो.

श्री. गडकरी यांचा ‘नेव्हर डाय ॲटीट्यूड’ हे त्यांच्या स्वाभवाचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, श्री गडकरी हे कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात म्हणूनच ते मोठे कार्य उभे करू शकतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची यशस्वी उभारणी केल्यानेच अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची जबाबदारी गडकरी यांच्यावर विश्वासाने सोपावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यातील हीच गुणवत्ता ओळखून त्यांच्यावर रस्ते आणि महामार्ग विकासाचे काम सोपवले. एकेकाळी जगातील पायाभूत सुविधा पाहण्यासाठी आपण अन्यत्र जात होतो, आज जग आपल्याकडे येत आहे, हे गडकरी यांचे यश आहे. त्यांच्या कार्यामुळे देशात रस्ते उभारणीच्या कामात गुणात्मक परिवर्तन सुरू झाले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख प्रस्थापित केली आहे. देशाच्या सीमेवर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करून श्री. फडणवीस म्हणाले, १८५७ चे स्वातंत्र्यसमर चिरडल्यानंतर देशामध्ये निराशा होती. इंग्रजी साम्राज्याचा सूर्य अस्तच होऊ शकत नाही अशाप्रकारची भ्रान्ती अनेकांच्या मनात तयार झाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी खंडित विखंडित अशा समाजाला वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून, सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आणलं आणि त्या माध्यमातून मोठा असंतोष तयार केला, जो पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक एक द्रष्टे नेता, खगोल शास्त्राचे अभ्यासक, गणितज्ञ होते. ज्योतिषशास्त्र त्यांना समजत होते, ते भाष्यकार होते, टीकाकार, उत्तम संपादक, लेखक होते. सर्व प्रकारच्या गुणांनी ते परिपूर्ण होते. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी श्री.गडकरी हे अत्यंत सुयोग्य व्यक्तीमत्त्व आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

श्री. गडकरी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहण्यास शिकवले. त्यासाठी निधी कसा उभा करायचा हे शिकवले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा लोकांना आवडतो. कोणतीही गोष्ट गुणवत्तापूर्ण असावी हा त्यांचा दंडक आहे. याबरोबरच ते देशभरातील कानाकोपऱ्यातील खाद्य संस्कृतीचे चाहते आहेत. आधुनिक भारताच्या जडण घडणीत गडकरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांना दिला जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपाने महाराष्ट्रातील एका दृष्ट्या, परिवर्तनशील, प्रेरक, कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्वाचा सन्मान केला जात आहे, ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी जोमाने काम करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, लोकमान्य टिळक हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आणि आदर्श आहेत. त्यांचे कर्तृत्व खऱ्या अर्थाने व्यासंगी आहे. त्यांच्या नावाने असणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही सन्मानाची बाब आहे. या सन्मानामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी येणाऱ्या काळात देशासाठी अधिक जोमाने काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकमान्य टिळक व त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या, देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्यांच्या कार्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहेात. टिळकांनी स्वदेशी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नासाठी प्रामाणिकपणे झटून कार्य करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात प्रचंड पैसा आणि तंत्रज्ञान आहे. यासोबत देशाकरीता प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.

आज आपण ॲटोमोबाईल उद्योगांमध्ये जपानला मागे टाकून अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहोत. येणाऱ्या काळात, शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात देशाला खूप संधी आहे. आपण प्रयत्नपूर्वक योगदान दिल्यास देशाला पहिल्या क्रमांकावर आणू शकतो. आपल्या देशात विश्वगुरु बनण्याची क्षमता आहे. हुशार युवाशक्ती आपल्याकडे आहे. सकारात्मक दृष्टीकोन आणि सकारात्मक राजकीय इच्छाशक्ती ठेऊन कार्य केल्यास आपण आपला देश जगात पहिल्या क्रमांकाची महासत्ता बनवू शकतो.

भारताला जगात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी योगदान सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले.

देशाच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, १२ हजार कोटी खर्चाचे मोठे टनेल ब्रम्हपुत्रेमध्ये बांधण्यात येत आहे. सायकल रिक्षांच्या ऐवजी ई-कार , इ बसेस बाजारात आणल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांकरीता १२ हजार कोटी रुपये दिले आहेत. डिसेंबरच्या आत महाराष्ट्रात ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू होतील. नवी मुंबई ते पुणे हायवेचे काम सुरू होत आहे. मुंबई ते बंगरूळू महामार्गचे काम हाती घेण्यात आले आहे. या नवीन मार्गामुळे पुणे ते मुंबई हा प्रवास दीड तासाचा होईल. पुणे परिसरात दोन लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. पुण्यात ३ नवीन पूल बांधण्यात येत आहेत. पुणे मेट्रो, विमानतळ कामाला गती देण्यात आली आहे. विकासाच्या कामात कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असेही श्री. गडकरी म्हणाले.

देशाच्या नवनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिल्पकराचा हा सन्मान-एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातल्या मराठी मातीतले सच्चे आणि दिलदार नेते असलेल्या नितीन गडकरी यांचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी याच पुण्यातून स्वराज्याचा मंत्र भारतीय जनतेला दिला. ब्रिटीशांनी ‘भारतीय असंतोषचे जनक’ म्हणून तर महात्मा गांधींनी ‘आधुनिक भारताचे जनक’ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार गडकरी यांना मिळणे ही अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांप्रमाणे श्री.गडकरी हे कार्यक्षमता आणि कार्यावर विश्वास ठेवणारे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवभारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिल्पकारांपैकी गडकरी एक आहेत. त्यांचे कर्तृत्व पक्षभेद, समाज, धर्म, राजकारण याच्या पलिकडे जाणारे आहे, त्यांच्या कृतीतून याची प्रचिती येते.

युती सरकारच्या काळात गडकरींनी मुंबईत बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांमुळे मुंबईत आज वाहतूकीची समस्या कमी करण्यासाठी मोलाची मदत होत आहे. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग, अनेक पोर्टची उभारणी, महामार्गचे जाळे निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. ते रस्ते विकासाचे महामेरू आहेत. भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी गडकरींचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. राज्यात मोठे निर्माण कार्य करतांना त्यांचा आदर्श राज्यातील नेतृत्वासमोर असतो. ते आदर्श नेता, आदर्श मंत्री आणि आदर्श मित्र आहेत. आर्थिक आणि रचनात्मक शिस्त पाळून त्यांनी आपल्या कार्यातून लौकीक निर्माण केला आहे. जात, पंथ, भाषा विरहीत विचार असलेले आणि माणूस गुणांमुळे मोठा होता हे तत्वज्ञान त्यांनी कार्यातून मांडले. त्यांचे कार्य विकासनिती आणि विकासकामे ‘लोकमान्य’ झाल्याने त्यांना लोकमान्य टिळकांच्या नावाने मिळालेला पुरस्कार अधिक समर्पक ठरतो, असे त्यांनी सांगितले.

विकासनिष्ठ, विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सन्मान -अजित पवार

लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री श्री.गडकरी यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, लोकमान्य टिळक परखड विचारांची ठाम भूमिका घेणारे आणि राष्ट्रसेवेची अखंड तळमळ असणारे असामान्य नेते होते. त्यांच्याच विचारावर चालणाऱ्या श्री.गडकरी यांची पुरस्कारासाठी झालेली निवड अत्यंत योग्य आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या गडकरींनी पुरस्कार मिळणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.नितीन गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणी नसून प्रयोगशील शेतकरी आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत.

श्री.गडकरी हे विकासाच्या विषयावर सतत चिंतन करणारे नेते असून आणि नवी माहिती एकत्रित करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक निर्णय घेतांना त्यांचा विचार स्पष्ट असतो आणि निर्णयातही धडाडी दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापुढे जावून समाजकारणाकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक आहे. बोलण्यातल्या स्पष्टपणासोबत स्वभावातील संवेदनशीलताही त्यांनी जपली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास धरून त्यांनी अनेक महत्वाचे मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसीत केले आहेत. महाराष्ट्राच्या किर्तीचा सुगंध ते देशात पसरवीत आहेत. स्वभावातील विनय आणि सहकार्याचा धागा जपून वाटचाल करणाऱ्या विकासनिष्ठ, विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा हा सन्मान आहे, असे श्री.पवार म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित टिळक यांनी केले.ते म्हणाले, १९८३ मध्ये कै.जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना देण्यात आला होता. भारताला प्रगतीशील राष्ट्र करण्यासाठी आणि जगभरात देशाचा लौकीक वाढविणाऱ्या व्यक्तिंचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. यावर्षी आपल्या कार्याने रस्त्यांच्या माध्यमातून देशाला जोडण्याचे कार्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्रस्टने एकमताने निवड केली आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी स्वर्गीय दिपक टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित व्यक्तिंच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर,
विश्वजीत कदम, बापूसाहेब पठारे तसेच हर्षवर्धन पाटील, प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0