MLC election : विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का  : सहापैकी 4 जागांवर भाजप विजयी 

HomeBreaking NewsPolitical

MLC election : विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का  : सहापैकी 4 जागांवर भाजप विजयी 

Ganesh Kumar Mule Dec 14, 2021 7:19 AM

Sambhaji Patil Nilangekar : आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त!
OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप!

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का

: सहापैकी 4 जागांवर भाजप विजयी

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Parishad Election Result) आज (14 डिसेंबर) जाहीर झाला. अर्थात, सहापैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा निकाल आगोदरच लागला आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर (Nagpur) आणि अकोला-वाशिम-बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule), तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी ठरले. यामुळं या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी चार जागांवर भाजपनं विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय.

विधानपरिषदेच्या एकूण 6 जागांवर निवडणुका आयोगानं जाहीर केल्या होत्या. त्यातील मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या, तर अकोला-वाशिम बुलडाणा आणि नागपूरमध्ये मतदान झालं. अकोला-वाशिम-बुलडाण्यात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) विरूद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल असा सामना रंगला होता, तर नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंसमोर काँग्रेसचा उमेदवार होता. मात्र, ऐनवेळी समीकरण बदललं. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पसंती दिली, तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Ravindra Bhoyar) यांना पक्षाने तिकीट दिलं. मात्र, त्यांची उमेदवारी घोषित होताच राजकीय समीकरणं बदलून गेली आणि मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. याचाच फायदा उठवत बावनकुळेंनी बाजी मारली. बावनकुळेंना 362 मतं मिळाली, तर मंगेश देशमुखांना (Mangesh Deshmukh) 186 मतं मिळाली आहेत. मात्र, काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे, तर 5 मतं अवैध ठरली. नागपूर, अकोल्यात भाजप उमेदवारांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय.

अकोल्यात खंडेलवालांची शिवसेनेवर बाजी

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यात बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला–बुलडाणा–वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. शिवसेनेचे बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या 18 वर्षांनंतर इथं भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. शिवसेना-भाजप यांची युती असल्यानं भाजपला तिथं यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती. याठिकाणी 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झालाय.

कोल्हापुरात अमल महाडिकांची माघार, सतेज पाटील बिनविरोध

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील एका जागेसाठी राज्याचे मंत्री सतेज पाटील (Satej patil) आणि भाजप नेते अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात सामना होता. गत काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुका बिनविरोध घेण्यात आल्यानं आता या विधानपरिषदेच्या निवडणुका सुद्धा बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न चालू होते. अशातच सर्वात जास्त लक्ष असलेली कोल्हापूरची जागा यावर्षी बिनविरोध निवडली गेली. परिणामी, राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बिनविरोध आमदार झाले. दरम्यान, कोल्हापूरच्या मातीत यावेळी तुल्यबळ लढत होण्याची अपेक्षा होती. पण, भाजप नेतृत्वानं ही जागा बिनविरोध काॅंग्रेसच्या पारड्यात टाकल्यानं पाटील यांना काही मेहनत घ्यायची गरज पडली नाही. त्यामुळं सतेज पाटील हे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.

तर दुसरीकडं मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागाही बिनविरोध झाल्या आहेत. मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुरेश कोपरकरांनी माघार घेतली, त्यामुळं भाजपचे राजहंस सिंग (Rajhans Singh) आणि शिवसेनेचे सुनील शिंदे हे बिनविरोध विधान परिषदेत जाणार आहेत. धुळे-नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे गौरव वाणी यांनी अर्ज मागे घेतला, तसेच शाम सनेर, भुपेश पटेल आणि दीपक दिघे यांनीही अर्ज मागे घेतले. मुंबईच्या दोन, धुळे-नंदुरबार, वाशिम-बुलढाणा-अकोला, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही निवडणूक आहे. त्यामुळं इथंही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0