महाराष्ट्राच्या भावी राजकारणाला नेमकी दिशा देणारा विजय – मोहन जोशी
पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा केलाला दणदणीत पराभव ही महाराष्ट्रातील भावी राजकारणाची दिशा दाखवते. सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ देखील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीने स्वतःकडे खेचून आणला. या मतदारसंघात भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती व गुंडशक्ती याबरोबरच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करूनही मतदारांनी भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नाकारले. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असा फौजफाटा घेऊन उतरलेल्या भाजपने आजारी असणाऱ्या खा.गिरीश बापट यांनादेखील प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न केला. काहीही करून निवडणूक जिंकायची यासाठी भाजप कोणत्या थरापर्यंत जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र कसब्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपला धिडकारून महाविकास आघाडीला दणदणीत मतांनी विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो.
कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकीचा विजय – पृथ्वीराज चव्हाण
कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. गेली 32 वर्षे पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. 2019 च्या निवडणुकीत मुक्ता टिळक या भाजप कडून निवडून आल्या होत्या. त्यांच्या दुःखद निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकीचा विजय झाला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
यापुढे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाविकास आघाडीने एका विचाराने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली व त्यांना महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी मदत केल्यामुळे हा विजय झाला आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी भाजप व शिंदे गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.
विरोधकांच्या मतांची विभागणी टाळली तर आमचा विजय होऊ शकतो. चिंचवड ला हेच आम्हाला बघायला मिळेल की, विरोधकांच्या मतांची विभागणी करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा केला गेला. आणि त्यामुळे बरीच मत हि तिसऱ्या उमेदवाराने खाल्ल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. पण भाजपविरोधी जनमत मोठे असल्याचे या दोन्ही निवडणुकीच्या निकालातून समजून आले आहे.
वंचित आघाडीने त्यांची ताकद नसताना फक्त महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्याकरिता तिसरा उमेदवार उभा केला.