Accident | स्वामी नारायण मंदिरा अपघात | अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठित

HomeBreaking Newsपुणे

Accident | स्वामी नारायण मंदिरा अपघात | अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठित

Ganesh Kumar Mule Apr 23, 2023 1:08 PM

PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन
Property Tax collection | मिळकतकर वसुलीसाठी 75 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज  | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
The Maharashtra Lokayukta Bill | महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

| अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठित

पुणे| मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपूस केली. जखमी व्यक्तींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, आपत्कालिन वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिलेश हराळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश चापे आदी उपस्थित होते.

अपघातग्रस्त रुग्णांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघाताबाबत आढावा घेण्यात आलेला आहे. येथे होणाऱ्या अपघाताची कारणे व त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या असून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने काम करण्यात येत आहे.

खासगी बस आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये २२ प्रवासी जखमी झाले आहेत. ससून रुग्णालय येथे ५ व्यक्ती, चव्हाण मल्टीस्पेशालिटी रुग्णालय येथे ९ व्यक्ती, नवले रुग्णालय येथे ६ व्यक्ती, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे २ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती बरी आहे. एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. रुग्णांना आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अपघाताची तीव्रता लक्षात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी वाहतुक शाखचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केल्याचे आदेश डॉ. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्गमित केले आहे. या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य तर प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम समावेश करण्यात आला आहे.

समितीने घटनेचा अभ्यास करुन सात दिवसात अहवाल सादर करावा. या प्रकारचे अपघात कमी करण्याच्या अनुषंगाने कमी कालावधीत (तात्काळ) करावयाच्या उपाययोजना आणि प्रदीर्घ कालावधीत करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात याव्यात. या ठिकाणांच्या आपघातांबाबत ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ या संस्थेने सुचविलेल्या उपाययोजना व केलेल्या उपाययोजना याचाही अहवालात अंतर्भाव असावा, अशा सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची नावे पुढीलप्रमाणे: वैभव अनिल वनारसे (वय ४६ वर्ष) रा.बदलापूर, हरिदास मुगुट मांढरे (वय ४७ वर्ष), रा.धनवडी जि. सातारा, ओमकार अनिल वनारसे (वय १७), रा. बदलापूर, साहेबराव कोंडींबा वाघमोडे (वय २६ वर्ष) बुलढाणा आणि अधिरा प्रमोद भास्कर (वय ६ वर्षे) रा. कोल्हापूर अशी रुग्णांची नावे आहेत
0000