Mahila Ayog Aplya Dari | पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी

HomeBreaking Newsपुणे

Mahila Ayog Aplya Dari | पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी

Ganesh Kumar Mule Jul 17, 2022 11:19 AM

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन
Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!
PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी

पुणे दि.१७: राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड येथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

पुणे शहर भागातील तक्रारींची जनसुनावणी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्री बाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ पिंपरी-चिंचवड भागातील तक्रारींची जनसुनावणी सकाळी ११ वाजता होणार आहे.

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून होणार आहे.

पुणे जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी अंजनी काकडे (८७८८९२४८७२) किंवा शंभूराजे ढवळे (९०७५८३८३९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.