सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास महापौर कार्यालयात उपोषणाला बसणार
: राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा
पुणे : पुणे महापालिकेत विविध आस्थापनात ठेकेदारांमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षा रक्षक साधारणतः १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना कामगार कायद्यानुसार मिळणारे हक्क अधिकार मिळाले नाहीत. याना वेळेवर पगार देखील मिळत नाही. कपडे, बुट, टॉर्च, बेल्ट, काठी यांना नियमित मिळत नाहीत. सध्या सुरक्षा रक्षकांच्या कामासाठी नविन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. मात्र या ठेकेदाराचं अधिकारी काही सुरक्षा रक्षकांना कामावर येण्यास मज्जाव करत आहेत. या लोकांना कामावरून कमी केल्यास आयुक्त कार्यालयात, महापौर कार्यालयात व महापौर निवास या ठिकाणी हे सर्व सुरक्षा रक्षक आमरण उपोषणास बसतील. असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाच्या सुनील शिंदे यांनी दिला आहे.
: आयुक्तांना पत्र
याबाबत संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार या सर्व पुर्वी काम करत असलेल्या कोणत्याही सुरक्षा रक्षकांना कामापासून वंचित करू नये असे आपण स्वतः अश्वासन दिले असताना देखील ठेकेदार वय वर्ष ४५ पेक्षा जास्त व शिक्षण आठवी पेक्षा कमी असणाऱ्यांना कामावर येवू नये असे तोंडी आदेश देत आहेत. या कामगारांना कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम केलेले आहे. या एकाही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही. असे अश्वासन महापौर यांनी दिले आहेत. आपण स्वतः तसेच अतिरिक्त आयुक्त खेमनार साहेब यांनी आदेश देवूनही ठेकेदार व संबधित अधिकारी सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत आहेत या बाबतीत दोन वेळा सुरक्षा रक्षकांनी आंदोलन ही केलेले आहे. या बाबतीत संबधीत ठेकेदार व आपले अधिकारी यांना आपण सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करू नये असे स्पष्ट निर्देश द्यावेत. या उपर जर या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास आपल्या कार्यालयात, महापौर कार्यालयात व महापौर निवास या ठिकाणी हे सर्व सुरक्षा रक्षक आमरण उपोषणास बसतील या वेळी उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस आपण जबाबदार रहाल. तरी या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करू नये असे लेखी आदेश आपण संबधिताना द्यावेत. असे शिंदे यांनी म्हटले आहे.
COMMENTS