कात्रज ते विंझर बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत
: कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) नवीन बसमार्ग सुरू !
पुणे : पीएमपीएमएलकडून आजपासून मार्ग क्रमांक २९६ कात्रज ते विंझर या बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत करण्यात आला. तसेच मार्ग क्रमांक २०९ ब कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. या दोन्ही मार्गांच्या बसला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
कात्रज सर्पोद्यान स्थानक येथे या दोन्ही बससेवांचा शुभारंभ करण्यात आला. खडकवासला विधानसभा आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका राणीताई भोसले, नगरसेविका वर्षाताई तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक प्रकाशशेठ कदम, नगरसेविका अमृताताई बाबर, नगरसेविका स्मिताताई कोंढरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्यासह दोन्ही मार्गावरील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक २९६ – कात्रज ते वेल्हे-किल्ले तोरणा या बससेवेचा मार्ग कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, वेल्हे-किल्ले तोरणा असा असणार आहे. सध्या या मार्गावर ५ बसेसद्वारे साधारणपणे दर एका तासाने दिवसभरात एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
मार्ग क्रमांक २०९ ब – कात्रज ते सासवड या बससेवेचा मार्ग कात्रज, येवलेवाडी, बोपदेव घाट, भिवरी, गराडे, कोडीत, सासवड असा असणार आहे. सध्या या मार्गावर १ बसद्वारे साधारणपणे अडीच तासाने दिवसभरात एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
गेल्या एक ते सव्वा वर्षात पुणे शहराला लागून असलेल्या तालुक्यांमधील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून ३५ नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले. यामुळे नवीन बसमार्गांवरील ३५० ते ४०० गावे पुणे शहराला जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. मार्च महिन्यात पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन १०० ई-बसेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे.
COMMENTS