आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली
: विद्यार्थ्यांची ओढाताण
पुणे : आरोग्य विभागाची आज होणारी परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचत असताना आरोग्य विभागाने परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक विद्यार्थी एसटी, खासगी बसने परीक्षा केंद्रावर पोहचत असताना हा मेसेज आल्याने गोंधळ उडाला. बाहेरील गावाहून परीक्षा केंद्रावर पोहचत असलेले अनेक विद्यार्थी परत आपल्या गावी गेले.
: कधी होणार परीक्षा?
ही परीक्षा नंतर कधी होणार ? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आरोग्य विभागाने (health department)दिले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परीक्षा कधी होणार याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेही नाही. आज आणि रविवारी (ता. 26) होणारी आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला होता.
दोन दिवसापूर्वी याबाबत सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित
उमेदवारांना हॉल तिकीट वेळेत मिळावे, सर्व्हर व्यवस्थित सुरू असावा, उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांचे समाधान करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करावी, अशा सूचना टोपे यांनी दिल्या होत्या. पण ऐनवेळी प्रशासनाने घातलेल्या गोंधळामुळे नुकसान झाल्याने विद्यार्थांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक चुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत. असे असताना ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता चांगलाच गोंधळ उडाला आहे. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला.
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री तुम्ही घरात बसून असता, पण विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. यातूनही एखादा ‘स्वप्नील लोणकर’ तयार व्हावा असे सरकारला वाटते का? तुमच्या या भोंगळ कारभारात विद्यार्थ्यांचा बळी घेऊ नका, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका
भाजप, महाराष्ट्र.
COMMENTS