पुणे : मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे. मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस व समृद्ध ,सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे. असे प्रतिपादन ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी केले.
: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये ‘”मराठी भाषा” या विषयावरील घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ,”नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेचे स्थान” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीला व सृजनक्षमतेला चालना देण्यासाठी “मराठी भाषेची महती” या विषयावर स्व:रचित “काव्य लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. तसेच “प्रश्नमंजुषा”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्रा .डॉ .छाया तांबे यांनी “मराठी भाषेचा इतिहास” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. गणेश चौधरी यांनी “वाचनाचे महत्त्व “या विषयावर समारोपीय भाषण केले.
सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला असला तरीही मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्गाने आपला सहभाग नोंदविला.
प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी “मराठी भाषेचे”महत्व या विषयावर व्याख्यान दिले ते आपल्या व्याख्यानात म्हणाले, “मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे.मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस व समृद्ध ,सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे.मातृभाषा हे संस्कारांचे विद्यापीठ आहे.आपले जीवन समृद्ध करण्यात भाषेचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे.मराठी भाषा ही अभिजात आणि माझ्या मते मराठी ही ज्ञानभाषा आहे. तिच्यावर कोणीही तज्ञ किंवा विचारवंत यांनी शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही .आपण प्रत्येकाने म्हटले पाहिजे माझ्या मराठी भाषेला अभिजात व ज्ञानभाषा याचा दर्जा आहेच.”
प्रा. डॉ.छाया तांबे यांनी “मराठी भाषेचा इतिहास ” याविषयी आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या “मराठी भाषेला संपन्न आणि समृद्ध वारसा आहे.मराठी भाषेचा इतिहास पाहताना लोकसाहित्य, लोकसाहित्याची मौखिक परंपरा यांचाही विचार होणे गरजेचे आहे. शिलालेख,ताम्रपट यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे . मराठी भाषा ही संत, पंत ,तंत यांनी समृद्ध केली आहे .मराठी भाषेला प्राचीनत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे.”
: दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व द्या : डॉ. गणेश चौधरी
“भाषा पंधरवडा” समारोप कार्यक्रमात अनंतराव पवार महाविद्यालय,पिरंगुट चे डॉ. गणेश चौधरी यांनी “वाचनाचे महत्व” या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या विवेचनात ते म्हणाले, “दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व द्या. भाषेला वाचवायचे असेल तर त्या त्या भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. जो माणूस ग्रंथाला गुरू मानतो तो एकाकी कधीही असू शकत नाही. वाचनाने श्रवण, वाचन,भाषण,लेखन ही भाषिक कौशल्ये विकसित होतात. वाचनाने विचारक्षमता वाढीस लागते. व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन विद्यार्थी वर्गाने केले पाहिजे. “भाषा पंधरवडा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .व्ही .एम शिंदे, उपप्राचार्य डॉ .एस .एफ ढाकणे, उपप्राचार्य डॉ .के.डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
COMMENTS
बातमी तयार करण्याची पद्धत अप्रतिम
धन्यवाद सर, आपला प्रतिसाद आमच्यासाठी महत्वाचा आहे.
खूप खूप छान डॉ. गावडे सर, डॉ. तांबे मॅडम आणि प्रा. मदने मॅडम आपण नेहमीच नाविन्य पूर्ण उपक्रम महाविद्यालयात राबवित असता. असेच नाविन्य पूर्ण उपक्रमांचा आस्वाद यापुढेही विद्यार्थी वर्गाला आपण करून द्याल. आपण आणि आपल्या मराठी विभागाने बातमी देखील नाविन्यपूर्ण पद्धतीने दिली आहे. असेच नाविन्य पूर्ण उपक्रम राबविण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा…!
स्तुत्य उपक्रम, मराठी भाषेच्या गौरवाबद्दल खूप खूप धन्यवाद,?