बदली झाली तरी मूळ खाते सोडू वाटेना!
| अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश
पुणे | महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यातील कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही बरेच कर्मचारी आपल्या मूळ खात्यातच काम करत आहेत. याबाबत आता अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी कडक धोरण अवलंबले आहे. बदलीच्या जागी रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. तसेच हे करण्यास कुचराई झाली तर खाते प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील व प्राथमिक शिक्षण विभागाकडील विविध हुद्यावरील
अधिकारी / कर्मचारी यांची पदस्थापनेने नियुक्ती व नियतकालिक बदली करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधितांनी पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये तात्काळ हजर होणेबाबत आज्ञापत्रांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, असे निदर्शनास आले आहे की संबंधित अधिकारी / कर्मचारी सदर आज्ञापत्रांनुसार
पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये हजर न होता अजूनही त्यांच्या मूळ खात्यात कामकाज करीत आहेत. ही बाब गंभीर असून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारी आहे.
त्यामुळे पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये हजर होण्याकरिता आजच्या आज कार्यमुक्त करून त्याबाबतचा खात्याचा नावासह पदनिहाय अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावयाचा आहे. तसेच संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या / बदलीच्या खात्यामध्ये हजर व्हावयाचे असून, सदर सेवक हजर न झाल्यास त्यांचे महिने महाचे वेतन संबंधित खातेप्रमुखांनी अदा करू नये. या प्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी व खातेप्रमुख यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता त्यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.