अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना मोडीत काढण्याविरोधात कर्मचारी संघटना देणार लढा
| 16 नोव्हेंबर च्या मेळाव्यात लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर केला जाणार
पुणे | महापालिका आरोग्य विभाग द्वारे अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना चालवली जाते. मात्र या योजनेवरील खर्च वाढत चालल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याबाबत आता महापालिकेच्या कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संघटनांकडून आता याविरोधात लढा उभारला जाणार आहे. बुधवार १६ नोव्हेंबर ला दुपारी ४.०० वाजता कामगार, कर्मचारी, अधिकारी व सेवानिवृत्त सेवकांचा मेळावा घेतला जाणार आहे. यामध्ये लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
महापालिका कर्मचारी संघटनांच्या निवेदनानुसार सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना (CHS), मोडीत काढून ही योजना खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या दावणीला बांधण्याचा प्रशासनाने चंगच बांधला आहे. सध्याची अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना तशीच अबाधित ठेवावी व खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया रद्द करावी असे आम्ही प्रत्यक्ष भेटून व वारंवार पत्रे देऊन प्रशासनाला यापूर्वीच कळवले आहे. त्याचबरोबर १२ मे २०२२ रोजी व त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी म.न.पा. भवनासमोर मोठी निदर्शने, आंदोलने करून मेडिक्लेम प्रक्रिया थांबवावी असे पुन्हा एकदा मांडले. खरे तर प्रशासनाने याचा बोध घेऊन ही प्रक्रिया तातडिने थांबवायला पाहिजे होती. त्याचबरोबर प्रशासक म्हणून ज्यांची नेमणुक झालेली आहे त्यांनी मोठे धोरणात्मक निर्णय सहसा घेऊ नयेत असा संकेत आहे. परंतु हा संकेत बाजूला टाकून वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्याकरीता, १) रंगनाल इन्शूरन्स ब्रोकिंग अँड रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड व २) जे. के. इन्शुरन्स ब्रोकर लिमिटेड, या दोन कंपन्यांना दिनांक २१-१०-२०२२ च्या स्थायी समितीच्या ठरावात मान्यता देण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, प्रशासनाने खरे तर पुणे महानगरपालिकेतील सर्व कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, पण तसे न करता खाजगी ब्रोकर कंपनी व मेडिक्लेम कंपनीच्या हिताला प्राधान्य दिल्याचे खेदाने नमुद करावे वाटते. सध्याच्या प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजनेनुसार जे लाभ मिळतात ते सर्व लाभ खाजगी मेडिक्लेम कंपन्या देऊ शकणार नाहीत ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ बाब आहे. आपली प्रचलित अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सेवक यांच्या हिताचा विचार व रक्षण करणारी असून तिचा मूलभूत उद्देश सेवकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हाचआहे. परंतु खाजगी मेडिक्लेम ईन्शुरन्स कंपन्यांचा उद्देश नफा कमवणे हा आहे. आपली प्रचलित सध्याची योजना केंद्र व राज्य सरकारच्या ५० लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वैद्यकिय सहाय्य योजनेप्रमाणेच आहे. त्यामुळे आपल्याबाबत वेगळा विचार करणे संयुक्तीक होणार नाही. या सध्याच्या योजनेमध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मूळ वेतन व डि.ए. च्या १% वाटा दरमहा या योजनेकरता देतो तसेच उपचारात एकूण बिलाच्या खर्चाच्या १०% वाटा देखील उचलतो. म.न.पा. प्रशासनाकडून वाढत्या खर्चाचा बोजा हेच कारणप्रामुख्याने पुढे केले जाते. सुमारे ६००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणान्या पुणे मनपाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ५० ते ६० कोटी रुपये खर्च केला तर ते वावगे ठरणार नाही. तसेच तो एकूण खर्चाच्या तुलनेत अगदी अल्प आहे.
पुणे मनपामध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ७१% टक्के आहेत व उर्वरीत अधिकारी व इतर कर्मचारी आहेत. हे सगळे मिळून पुणे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे रक्षण करणे व इतर नागरी सेवा पुरवणे अशी विविध कामे करतात. यातील अनेक कामे ही आरोग्याला घातक अशी आहेत. कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करताना ८८ कायम कर्मचाऱ्यांनी व १३ कंत्राटी कामगारांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व पुणे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे रक्षण केले, यामुळे या कर्मचान्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे विशेष गरजेचे आहे. याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या हिताचाच विचार करणे हे आम्ही सहन करणार नाही. लेखी अर्ज, विनंत्या हे सर्व करुन झाले आहे, परंतु याची कशाचीही दखल न घेता प्रशासनाने ब्रोकरची नेमणूक करुन आपला उद्देश स्पष्ट केला आहे. आता आपल्यालासुद्धा नाईलाजाने आंदोलन तसेच कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलावे लागणार आहे. त्यादृष्टीने पुढील लढ्याची कृती ठरवून
जाहीर करण्याकरीता बुधवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता, गणेश कलाक्रीडा रंगमंच, स्वारगेट जवळ, पुणे येथे सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी व सेवानिवृत्त सेवकांचा मेळावा, पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व त्यांच्या सहयोगी संघटनांनी आयोजित केला आहे. या मेळाव्यात सर्वांनी मोठ्या संख्येने यावे व सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना अबाधित ठेवण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे. असे कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
जाहीर करण्याकरीता बुधवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता, गणेश कलाक्रीडा रंगमंच, स्वारगेट जवळ, पुणे येथे सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी व सेवानिवृत्त सेवकांचा मेळावा, पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व त्यांच्या सहयोगी संघटनांनी आयोजित केला आहे. या मेळाव्यात सर्वांनी मोठ्या संख्येने यावे व सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना अबाधित ठेवण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे. असे कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
—