डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूदच नाही!
| योजना सुरु नाही केल्यास आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा
पुणे | पुणे मनपाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जाते.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काही मोफत तपासण्या केल्या जातात. या योजनेचा लाभ गरजू, गरीब, ज्यांना कसलाही अधार नाही, अशा ज्येष्ठ महिला-पुरुषांना होत होता. मात्र या योजनेसाठी चालू बजेटमध्ये तरतूदच करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना लाभ घेता येणार नाही. याबाबत शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आक्षेप घेत योजना सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच योजना सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या अंतर्गत क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड मार्फत कोथरूड येथील सुतार हॉस्पिटल व कमला नेहरू हॉस्पिटल येथे दोन डायग्नोस्टिक सेंटर चालविली जातात. या सेंटरमध्ये पुणे मनपाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जाते.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काही मोफत तपासण्या केल्या जातात. या योजनेचा लाभ गरजू, गरीब, ज्यांना कसलाही अधार नाही, अशा ज्येष्ठ महिला-पुरुषांना होत होता. परंतु आता १ एप्रिल २०२३ पासुन ही योजना राबवू नये म्हणून क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड यांना आरोग्य अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकारी याच्या सहीने एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे सदर योजना बंद करावी असे म्हटले आहे. हे निश्चितच चुकीचे व अन्यायकारक आहे. मनपाकडून अनावश्यक अशा अनेक कामासाठी बजेटमध्ये कोटयावधी रूपयांची तरतूद केली जाते. परंतु सामान्य नागरिकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मनपा तरतूद करू शकत नाही हे निश्चितच निषेधार्य आहे. आपण त्वरीत ही योजना चालू करण्याचे आदेश संबंधितांना दयावेत व ही योजना चालू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरीत करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन आपल्या कार्यालयामध्ये करावे लागेल. असा इशारा सुतार यांनी दिला आहे.