Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार
| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना पाण्याचा निचरा करण्यासाठी नियुक्त केले जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे शहरामध्ये पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी तसेच कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने स्टॉर्म वॉटर व ड्रेनेज यावरील जाळ्यांमध्ये कचरा, राडारोडा व पालापाचोळा येतो. त्यामुळे पावसाळी जाळ्या व ड्रेनेज ब्लॉक होतात. सदर ठिकाणी कचरा, राडारोडा व पालापाचोळा तात्काळ काढल्यास पाण्याचा निचरा होऊ शकतो. याकरीता पावसामुळे पाणी साठणारी ठिकाणे यांची माहिती क्षेत्रिय स्तरावर उपलब्ध आहे.
या ठिकाणी मनपाचे सेवक तसेच मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचेमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे नेमण्यात आलेले निविदाधारकाचे मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त आकस्मिक परिस्थितीत या मनुष्यबळा व्यतिरिक्त अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेकडील मनुष्यबळ देखील उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी या कामाची आवश्यकता असेल त्यावेळेस सेवा उपलब्ध करण्यास इच्छुक असलेल्या स्वच्छ सेवकांची माहिती, संपर्क क्रमांक क्षेत्रीय कार्यालयाने संकलित करावे. असे आदेशात म्हटले आहे. तसेच सेवक नेमण्यासाठी आयुक्तांनी एक कार्यपद्धती ठरवून दिली आहे.
| अशी असणार कार्यपद्धती
स्वच्छ संस्थेच्या सेवकांकडून आवश्यकता भासल्यास ज्या दिवशी काम करून घेण्यात येईल त्यावेळचे वेतन क्षेत्रीय स्तरावरून आदा करण्यात यावे. सदर वेतन क्षेत्रीय स्तरावर ठेकेदारामार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटी सफाई सेवकांना ज्या दराने आदा केले जाते त्याच दराने आदा करण्यात यावे.
सदर कामावर क्षेत्रिय स्तरावरील उप अभियंता व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांचे नियंत्रण असेल. तसेच संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी सदर सेवकांचे उपस्थितीची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
सदर कामी आवश्यक असणारी स्वच्छ सेवक संख्या, स्वच्छ सेवकांचे वेतनाचे दर इत्यादीबाबची आवश्यक ती प्रशासकीय मान्यता क्षेत्रिय स्तरावरून घेण्यात येऊन त्यांची बिले क्षेत्रिय स्तरावरून आदा करण्यात यावी.