Dr Dhananjay Kelkar | वैद्यकीय आयोगाने डॉ. केळकर यांची मान्यता रद्द करावी – अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कार्यकर्ते विशाल विमल यांची मागणी
Deenanath Mangeshkar Hospital – (The Karbhari News Service) – वैद्यकीय आयोगाने डॉ. धनंजय केळकर यांची मान्यता रद्द करावी. अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कार्यकर्ते विशाल विमल (Vishal Vimal ANIS) यांनी केली आहे. (Pune News)
विशाल विमल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारामुळे गेल्या आठवड्यात एका तरुण महिलेचा प्रसुतीच्या दरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने आणि डॉक्टरने प्रसुतीसाठी ऍडमिट होताना सुमारे दहा लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली होती. मात्र सदर महिला, कुटुंबीय नातेवाईक यांनी दहा लाख रुपयांऐवजी तीन लाखांची तजवीज करून देखील त्यांना ऍडमिट करून घेतले नाही. त्यामुळे सदर महिलेला अन्य हॉस्पिटलमध्ये जावे लागले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सदर महिलेचा वेळ गेला आणि त्यामुळे सदर महिलेच्या प्रसुतीसंबंधी अनेक गुंतागुंतीच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर विविध क्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘रुग्णालयामध्ये ऍडमिट होताना रुग्णांनी भरून द्यावयाच्या फॉर्ममध्ये डिपॉझिट रक्कम डॉक्टरांनी लिहिण्याची पद्धत नाही. मात्र ती डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून लिहिली गेली. कारण राहू, केतू त्यांच्या डोक्यात आले म्हणून दहा लाख रुपये ते लिहून गेले, असा अशास्त्रीय खुलासा डॉ. धनंजय केळकर यांनी केला आहे.
कोणताही शास्त्रीय आणि व्यवहारिक आधार नसलेल्या ज्योतिषात राहू, केतू हे दोन ग्रह मानले आहेत. मात्र खगोलशास्त्रामध्ये राहू, केतूला ग्रह म्हणून मान्यता नाही. आणि खरे तर कोणतेही ग्रह हे पृथ्वीवरील मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत, हे शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट झालेले आहे. रुग्णालयाचे जबाबदार म्हणून डॉ. धनंजय केळकर यांनी केलेला दावा हा डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून माहिती घेऊनच केलेला असणार आहे. त्यामुळे विज्ञान शाखेचे असणारे डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांना ग्रहांसंबंधी शास्त्रीय माहिती नसणे हे अत्यंत धक्कादायक आहे. पूर्वपरंपार त्यांच्यावर असणारे संस्कार हे शिक्षणाने देखील गेलेले नाही, याचा त्यांच्या वक्तव्यातून पुरावा मिळतो. अंधश्रद्धाळू, कर्मकांडी आणि ब्राह्मण्यवादी प्रभाव डॉ. धनंजय केळकर यांच्यावर असल्याने त्यांनी राहू, केतू डोक्यात आल्याने दहा लाख रुपये डिपॉझिट रुग्णाने भरण्यासंबंधीची घटना घडल्याचे वक्तव्य केले आहे. स्वतःच्या चुकांची जबाबदारी झटकून त्या चुका राहू आणि केतूच्या माथी मारणे, यामागे चालूगिरी, कावेबाजपणा आणि धूर्तपणा आहे. भविष्यात एखाद्या रुग्णावर निदान, उपचार करत असताना रुग्णालय आणि डॉक्टरांकडून एखाद्या रुग्णावर विपरीत परिणाम झाले अथवा एखादा रुग्ण दगावला तर हे रुग्णालय आणि डॉक्टर हे सदर गोष्ट ही शनी, मंगळ अथवा राहू, केतूमुळे घडल्याचे सांगून हात वर करणार असल्याचे दिसते. आणि मग सदर चुकीसंबंधी न्यायालयाने नक्की शनी, मंगळ, राहू,केतूला शिक्षा ठोठावायची का ? असा प्रश्न पडतो. असे विशाल विमल यांनी म्हटले आहे.
एकूण वैद्यकशास्त्र हे कार्यकारणभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन या पद्धतीवर उभे आहे. आजारांचे निदान, उपचार, शस्त्रक्रिया, औषध निर्माण हे सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पद्धतीने घडत असते. याचे सर्व शिक्षण डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांनी घेऊन देखील ते शास्त्रीय उपचार पद्धती विसरले की काय असा प्रश्न पडतो. डॉ. धनंजय केळकर यांनी केलेल्या बेकायदेशीर अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे समर्थन घडले आहे. उद्या वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील. त्यामुळे असा अशास्त्रीय दावा केल्याससंबंधी डॉ. धनंजय केळकर डॉ. सुश्रुत घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रद्द करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत. असे विशाल विमल यांनी म्हटले आहे.
COMMENTS