Jyotiraditya Shinde | देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार |  केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

HomeBreaking Newsपुणे

Jyotiraditya Shinde | देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार | केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

Ganesh Kumar Mule Nov 26, 2022 10:37 AM

Bhide Wada | भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती
PMC Encroachment Department | पुणे मनपा अतिक्रमण विभागाकडून 22 गणेश मंडळावर कारवाई
SSC Results | कासारआंबोलीचा जुनैद तांबोळी SSC परीक्षेत मुळशी तालुक्यात प्रथम

देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

पुणेः  देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावरून (Pune Airport) कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) येथे केली. लोहगाव विमानतळ येथील बहुप्रतिक्षित व बहुचर्चित असलेल्या मल्टिलेव्हल अत्याधुनिक पार्किंगची (Multilevel Parking) सुविधा देणाऱ्या ‘ एरोमाॅल’ चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील, लोकसभा आमदार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट, राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे, एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडियाचे दिल्लीचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“कार्गोची ही सेवा मुंबईपाठोपाठ पुणे विमानतळावरून उपलब्ध होणार आहे. पुण्याचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होत आहे. कला, संस्कृती, व्यापार, औद्योगिकनगरी अशी या शहराची क्षमता व गुणवैशिष्ट्य आहे. पुण्याचा नावलौकिक केवळ देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे,” शिंदे यांनी सांगितले.
१२ नोव्हेंबरपासून बँकाॅकची थेट विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. पाठोपाठ आता १ डिसेंबरपासून सिंगापूरलाही थेट विमान सेवा सुरू होईल असे मी आश्वस्त करतो. आयटी व अन्य उद्योगव्यवसायाच्या विस्तारासाठी देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचा विस्तार मे २०२३ पर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुण्यात आवश्यक असलेल्या सुविधा व प्रकल्पांसाठी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून आम्ही नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व यापुढेही देऊ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. विमानतळ परिसरात देखील याचा प्रत्यय मला आला. त्या अनुषंगाने एरोमाॅलची ही सुविधा पुणेकरांना समर्पित करताना मला विशेष आनंद होतो आहे, असेही शिंदे म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरवातीला शिंदे यांचा सत्कार गिरीश बापट यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, शाल व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एएआयचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता यांनी खासदार बापट यांचे स्वागत केले.  ‘पेबल्स’ इन्फ्राटेक लिमिटेडचे संचालक रवी जैन यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. खासदार वंदना चव्हाण यांचा सत्कार एएआयचे प्रादेशिक कार्यकारी संचालक जे टी राधाकृष्णन यांनी केला व आमदार सुनील टिंगरे यांचा सत्कार ‘ पेबल्स’ चे संचालक सुनील नहार यांनी केला. अनिल गुप्ता यांचा सत्कार पेबल्सचे संचालक अभिजित कोतकर यांनी केला.
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, लोहगाव विमानतळावर अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत याचा आनंदच आहे. शहरात नवीन विमानतळ येण्याच्या दृष्टीने आता आवश्यक ती पावले उचलून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नवीन विमानतळाचे काम पूर्ण होण्यास अद्याप अवकाश आहे. त्यामुळे उपलब्ध विमानतळांवर अत्याधुनिक व प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा देण्यास आमचे प्राधान्य व प्रयत्न आहे.
खासदार बापट म्हणाले, शिंदे यांनी पुणेकर नागरिकांच्या मागण्यांचा नेहमीच सकारात्मक विचार केला आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनलसह कार्गो सुविधेबाबतही त्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. कार्गो सुविधेच्या उद्घाटनासाठीही शिंदे यांनीच यावे अशी आमची इच्छा आहे.
पुणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने डॉ. शैलेश गुजर व रामदास मारणे यांनी आणलेल्या शिंदेशाही पगडीने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते खासदार गिरीश बापट यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले. रवी जैन यांनी आभार मानले.
————