शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका
| आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना
बार्शी तालुक्यातील सध्याची पाऊसाची परिस्थिती व पेरणीचा आढावा, तसेच खते बी-बियाणे यांची उपलब्धता या बाबतीत प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत कृषी विभाग बार्शी तालुका व खते दुकानदारांची आढावा बैठक आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
बार्शी तालुक्यात जून महिन्यातील प्रदीर्घ विश्रांतीनंतर सध्या पाऊसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले आहे. या पाऊसाच्या आगमनाने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने, त्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील सध्याची पेरणीची परिस्थिती पाहता, तालुक्यातील शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे यांची कमतरता भासू नये, त्यांना उच्च व चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे उपलब्ध व्हावी यासाठी खत दुकानदार व कृषी विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचना बैठकीत दिल्या.
त्याचबरोबर तालुका कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, पेरणी करीता योग्य असलेले चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे यांबाबत जनजागृती करावी असे आवाहन संबंधित कृषी खात्याच्या अधिका-यांना केले. तसेच खते दुकानदारांनी शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे अडवणूक व फसवणूक करू नये अशा सक्त सूचना, दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत.
या बैठकीत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, त्यांना पेरणीच्या कामामध्ये तसेच खते, बी-बियाणांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, रावसाहेब मनगिरे, विलास आप्पा रेनके, कुंडलिकराव गायकवाड, बाबासाहेब मोरे, खते दुकानदार व कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.