निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांशी करणार चर्चा; चिंता नको, काळजी घ्या : महापौर मोहोळ
– महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा
पुणे : ‘गेल्या आठवड्यापासून महापालिका हद्दीत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यात बहुतांश रुग्ण हे लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असणारे आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून महापालिकेची आरोग्ययंत्रणा सक्षमपणे सज्ज ठेवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी आढावा बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, अश्विनी लांडगे, फरजना शेख, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह पक्षनेते, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘मागील आठवडाभरात सक्रीय रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात ८० टक्क्यांपर्यंत रुग्ण हे लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र प्रत्यक्ष दवाखान्यात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. तरीही आपण पूर्ण क्षमतेने तयारी केली आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीत ४ हजार रेमिडिसिव्हीर इंजेक्शन, १ हजार ८०० खाटा, ९ हजार ५०० एलपीएमची ऑक्सिजन निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. ऑक्सिजन साठवण करण्याची ९ ठिकाणी सोय करण्यात आली आहे.’
‘शिवाजीनगर जम्बो हॉस्पिटलमध्येही यंत्रणा सज्ज असून कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु करता येऊ शकते. शिवाय एकूण ऑक्सिजन बेड्सची संख्या आणि कोरोना सेंटरची संख्या आवश्यकरेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके आणखी सक्रिय केली जाणार आहेत. ही पथके नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज असतील, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
COMMENTS