स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी
कोथरुड मधील किनारा चौकात असलेल्या भुयारी मार्गावरील उच्छवासाचे (व्हेंटीलेशन) बांधकाम रस्त्याच्या मध्ये आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हे बांधकाम हटवावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. पौडरस्त्यावर एमआयटी व जयभवानीनगर येथे असलेल्या भुयारी मार्गाला मध्यभागी कोठेही व्हेंटीलेशनसाठी सोय केलेली नाही. मात्र किनारा चौकात मध्यभागी व्हेंटीलेशनसाठी काही जागा सोडली आहे. या जागेला बंदिस्त केले असल्याने तेथून व्हँटीलेशन होत नाही. तसेच मेट्रोच्या कामानंतर हे बांधकाम नेमके रस्त्याच्या मध्ये येत असल्याने छोटेमोठे अपघात होतात. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे बांधकाम हटवावे व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरुड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. अपघाताला कारण असलेले हे बांधकाम हटवावे. या बांधकामाचा आडोसा घेवून येथे काही मालवाहू ट्रक लावले जातात. त्यामुळे आधीच अरुंद बनलेला रस्ता आणखी अरुंद बनून वाहतुक कोंडी होते. हे बांधकाम न पाडल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. खाजगी अभियंता कैलाश मारुती पारगे म्हणाले की, किनारा चौकात भुयारी मार्गावरील मधोमध असलेलं बांधकाम भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्याच्या उद्देशाने केले असावे. परंतु या बांधकामाची व भुयारी मार्गाची पाहणी केली असता त्याचा तसा कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसते. वातानुकूलन करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असल्याने हे बांधकाम हटवण्यास तांत्रिक दृष्ट्या काही अडचण आहे असे वाटत नाही. कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, हे बांधकाम हटवण्यासंदर्भात मागणी आली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा यासांठी प्रकल्प विभागाकडे सल्ला मागवला आहे. हवा खेळती राहण्यासाठी केलेले हे बांधकाम आहे. ते हटवल्यास त्याचा भुयारी मार्गावर काय परिणाम होईल, काय पर्याय असू शकतात हे पाहून प्रकल्प विभागाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल.