Contract Employees PMC | कंत्राटी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी मनपा ठोस पावले उचलणार – आयुक्त नवल किशोर राम यांचा ठाम शब्द
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – जसे मनपा प्रशासन दररोज आपल्या अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेते, तसेच ठेकदारांच्या कामाचा देखील नियमित आढावा घेणे आवश्यक आहे, असे परखड मत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले. (Pune PMC News)
ही भूमिका त्यांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) व पुणे मनपा सुरक्षा विभागाच्या (PMC Securtiy Department) संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात मांडली. सदर कार्यक्रम ESIC लोकल कमिटी सदस्य सुनील शिंदे यांच्या सहकार्याने पार पडला.
आयुक्त राम म्हणाले, “पुणे मनपाच्या विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर कंत्राटी कामगारांना वेळेवर पगाराची स्लिप न मिळणे, युनिफॉर्मचा अभाव, तसेच सुरक्षा व स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य न मिळणे अशा अनेक अडचणी आढळून आल्या. सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणे हे माझे प्राधान्य आहे. याच उद्देशाने मी स्वतः या कार्यक्रमाला हजेरी लावली.”
ते पुढे म्हणाले, “पुणे मनपाची सीमा वाढली आहे, पण कर्मचारी संख्या पूर्वीप्रमाणेच असून तीही कमी झाली आहे. मात्र मी कधीच कंत्राटी व कायम कामगारांमध्ये भेदभाव करत नाही. सर्व कामगारांना त्यांच्या हक्कांचे रक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे यंदा कंत्राटी कामगारांनाही कायद्यानुसार बोनस दिला जाणार असून त्यांची दिवाळी गोड होणार, याबाबत मी सर्वांना आश्वस्त करतो.”
या वेळी ESIC वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिमन्यू पांडा यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली, तर ESIC चे संयुक्त निदेशक श्री. सुकांता दास यांनी ‘SPREE’ योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपा शाखा व्यवस्थापक सौ. तृप्ती घोडके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी आभारप्रदर्शनाने केली.

COMMENTS