Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश! 

HomeपुणेBreaking News

Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश! 

गणेश मुळे Jul 10, 2024 3:17 PM

Vidhansabha Election Code of Conduct | मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी
Counting of Maharashtra Assembly Votes | मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त
Vijaystambh Sohala | पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश!

Dr Suhas Diwase – (The Karbhari News Service) –  पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातील रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी सतत अपघात होणाऱ्या ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Pune Collector)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योगेश्वर डी., पुणे मनपाचे वाहतूक नियोजक निखील मिझार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उप अभियंता एम. डी. कजरेकर आदी उपस्थित होते.

दिवसे म्हणाले, अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवरची उपाययोजना खूप महत्वाची आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांचा डेटा तयार ठेवावा. डेटाच्या आधारे उपाययोजनानंतर ब्लॅक स्पॉटवर किती अपघात कमी झाले, अपघात कोणत्या वेळी झाले याची माहिती मिळण्यास मदत होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका यांनी रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना आखाव्यात.

संबंधित विभागाने आवश्यकतेनुसार रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, सूचना फलक, रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी बसविण्याची कार्यवाही करावी. दर तीन महिन्यांनी रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, साईड पट्ट्या रंगविण्यात याव्यात. रस्त्यावरील सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर स्वच्छतागृहे, शौचालये यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.

पुणे शहरात होणाऱ्या अपघातामध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांची संख्या अधिक आहे. वाहतुक विभागाने अपघात कमी करण्यासाठी रस्ता वाहतुक नियम तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना कराव्यात. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने चांदणी चौकात वाहनचालकांना समजेल आणि दिसेल असे फलक रस्त्यावर लावावेत. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने, वाहनचालक यांची संबंधित विभागाने नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

पुणे जिल्ह्यात ३९ ब्लॅक स्पॉट्स आहेत असे यावेळी श्री. बहीर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात कमी करण्याच्यादृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, युनिसेफ व आयरॅड संस्थेच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.