शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना सांगितल्या जातात अनावश्यक तपासण्या!
: आरोग्य प्रमुखांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरी गरीब आरोग्य योजना चालवली जाते. मात्र महापालिकेच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना अनावश्यक चाचण्या सांगितल्या जात आहेत. यामुळे महापालिकेचा खर्च वाढत आहे. याबाबत आरोग्य प्रमुखांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत आवश्यक तेवढ्याच तपासण्या देण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील गरीब लोकांसाठी शहरी गरीब आरोग्य योजना चालवली जाते. या माध्यमातून वार्षिक उत्पन्न तोकडे असणाऱ्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जातात. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यावर महापालिकेचे दरवर्षी 50-60 कोटी खर्ची पडत आहेत. दरम्यान याबाबत काही चुकीचे प्रकार देखील वाढताना दिसत आहेत. ज्यामुळे महापालिकेचा खर्च वाढतो आहे. आरोग्य प्रमुखांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. त्यामध्ये या विषयाबाबत चर्चा करण्यात आली. असे दिसून येत आहे कि महापालिका दवाखाने आणि प्रसूती गृहातील निवासी वैद्यकीय अधिकारी शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना अनावश्यक तपासण्या सांगत आहेत. त्यामुळे महापालिकेचा खर्च वाढतो आहे. त्यामुळे बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले कि, यापुढे आवश्यक तेवढ्याच चाचण्या सांगण्यात याव्यात. शिवाय टेस्ट रेफरल फॉर्म परिपूर्ण आणि व्यवस्थित भरून द्यावा. सोबत कागदपत्रे देखील जोडली जावी.
COMMENTS