सावधान..! ओमिक्रॉन चा धोका वाढतो आहे!
नवी दिल्ली : देशातील ओमिक्रॉन या व्हेरिएंटच्या (Omicron variant)संसर्गाचा धोका बळावत असल्याने यंत्रणा सावध झाली असून देशातील एकूण बाधितांची संख्या २१३ वर पोचली आहे, महाराष्ट्र आणि दिल्लीत संसर्गाचा धोका वाढला आहे. राजधानी दिल्लीत ख्रिसमस आणि नववर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून अन्य राज्ये देखील तोच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज देशभरातील परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तरप्रदेशात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव आणि मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून अखिलेश यांनीही स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. डिम्पल आणि त्यांच्या मुलीवर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानमध्ये देखील आज ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सावध झाले आहे. दुसरीकडे वाढता संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली असून सरकारने मात्र सखोल संशोधनानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. याआधीही अशीच मागणी करण्यात आली होती.
ऑक्सिजन व्यवस्थापनावर भर
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून धडा घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्सिजनच्या प्रभावी आणि योग्य वापरावर भर दिला आहे. आता आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनच्या वापराचे धडे दिले जाणार असून उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करण्याबरोबरच थोडाही ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देश या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. राष्ट्रीय ऑक्सिजन परिचारक कार्यक्रमाला आज ‘एम्स’मधून सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या. कोरोना आणीबाणीच्या काळामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती त्यामुळे त्याचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाल्या.
देशातील मोठी लोकसंख्या कोरोना लशीपासून अद्याप वंचित असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ४२ टक्के लोकांचेच लसीकरण होऊ शकेल. आपल्याला संसर्गाची तिसरी लाट रोखायची असेल तर साठ टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार बूस्टर डोसचा कधी विचार करणार आहे.
– राहुल गांधी, नेते काँग्रेस
COMMENTS