बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे
: राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला
पुणे : पुण्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खासदार गिरीश बापट कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग करत बाहेर पडले होते. आयुक्तांच्या ( Pune Municipal Commissioner)घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’ असा टोला गिरीश बापट यांची लगावला होता. यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade)यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला आहे. “गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ” असा प्रश्न अंकुश काकडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे, असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे.
”पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे,” असा टोला काकडेंनी बापटांना लगावला आहे.
”बापटांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्त वर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भाजपचा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही,” असे अंकुश काकडे म्हणाले.
COMMENTS