Bajaj Pune Grand Tour 2026 | ल्यूक मुडग्वेच्या नेतृत्वाखाली ‘ली निंग स्टार’ संघ विजयी | पुण्यातील टप्प्यात ल्यूक विजेता; चौथ्या व अंतिम टप्प्यात ॲलिक्सेईची बाजी

Homeadministrative

Bajaj Pune Grand Tour 2026 | ल्यूक मुडग्वेच्या नेतृत्वाखाली ‘ली निंग स्टार’ संघ विजयी | पुण्यातील टप्प्यात ल्यूक विजेता; चौथ्या व अंतिम टप्प्यात ॲलिक्सेईची बाजी

Ganesh Kumar Mule Jan 23, 2026 8:43 PM

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!
Pune Airport Runway | पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
7th Pay Commission Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या 4 थ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

Bajaj Pune Grand Tour 2026 | ल्यूक मुडग्वेच्या नेतृत्वाखाली ‘ली निंग स्टार’ संघ विजयी | पुण्यातील टप्प्यात ल्यूक विजेता; चौथ्या व अंतिम टप्प्यात ॲलिक्सेईची बाजी

 

Pune Grand Tour – (The Karbhari News Service) –  ‘पुणे प्राइड लूप’ मध्ये उसळलेली गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात शुक्रवारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’चा शानदार समारोप झाला. यात पुण्यातील टप्प्यात ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मुडग्वेने बाजी मारली, तर सांघिक विजेतेपद ली निंग स्टार संघाने पटकावले. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात श्नायर्को अॅलिक्सेईने (१ तास ५६ मिनिटे ५४ से.) अव्वल क्रमांक पटकावला. या पाच दिवसाच्या स्पर्धेने जगात भारताचे पर्यायाने पुण्याचे नाव उंचावले आहे.

चौथ्या टप्प्यात सायकलस्वारांनी शहराच्या मध्यभागातून ९५ किलोमीटरचा प्रवास केला. ५७८ मीटरची चढण पार करून ही शर्यत पुण्याच्या अनेक ऐतिहासिक रस्त्यांवरून आणि शनिवारवाड्यासारख्या वास्तूंच्या जवळून गेली. चार टप्प्यात सायकलस्वारांनी एकूण ४३७ किलोमीटर अंतर पार केले. यात ली निंग स्टार संघाने २८ तास ४१ मिनिटे १९ सेकंद अशा एकत्रित वेळेसह संघ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ल्यूक मुडग्वे याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर चीनच्या या संघाने सर्व चार टप्प्यांवर आपले वर्चस्व राखले. स्पेनचा बर्गोस बर्पेललेट बीएच संघ (२८ तास ४२ मिनिटे ०९ से.) दुसऱ्या, तर मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग संघ (२८ तास ४८ मिनिटे १९ से.) तिसऱ्या स्थानावर राहिला. शुक्रवारी चौथ्या टप्प्यात ‘ली निंग स्टार’ संघाच्या अॅलिक्सेईने बाजी मारली. त्याचा सहकारी कॅमेरून निकोलस स्कॉट याने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली, तर ‘रूजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाच्या डायलन हॉपकिन्स याने तिसरे स्थान मिळवले.

या सर्वांच्या केंद्रस्थानी ल्यूक होता. ल्यूकने पहिल्या दोन टप्प्यात बाजी मारली होती. तोच निर्विवाद विजेता म्हणून समोर आला. पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २९ संघांमधील १६४ एलिट (अव्वल) रायडर्सविरुद्ध स्पर्धा करताना, त्याने एकूण ९ तास ३३ मिनिटे ०४ सेकंद अशा एकूण वेळेत ही शर्यत पूर्ण केली. थायलंडच्या ‘रूजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाचा आणि ल्यूकचा सर्वांत जवळचा स्पर्धक एलन कार्टर बेटल्स, केवळ १४ सेकंदांनी मागे राहिला, तर बेल्जियमच्या ‘टार्टेलेटो-आयसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसेन ३३ सेकंदांच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर राहिला.

ल्यूकने पहिल्या दिवशी ‘मुळशी-मावळ माईल्स’च्या टप्प्यात ‘यलो जर्सी’ आपल्या नावे केली होती आणि त्यानंतर ती शेवटपर्यंत कोणालाही मिळवू दिली नाही. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू म्हणून ‘ग्रीन जर्सी’देखील पटकावली. अशाप्रकारे, जिद्द आणि धोरणात्मक चातुर्य यांचा मेळ घालून त्याने या आठवड्याचा यशस्वी समारोप केला.

ल्यूक म्हणाला…
सर्वसाधारण विजेतेपद पटकावल्यानंतर ल्यूकने वैयक्तिक कौशल्यापेक्षा सामूहिक प्रयत्नांना विजयाचे श्रेय दिले. तो म्हणाला, ‘माझा संघ खरोखरच खूप चांगला आहे. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझी काळजी घेतली. तुम्ही गेल्या दोन दिवसांत पाहिल्याप्रमाणे, आमच्या इतर दोन रायडर्सनी विजय मिळवला. त्यामुळे, आम्ही तीन वेगवेगळ्या रायडर्ससह विजय मिळवले आहेत आणि आजचा हा विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट, उत्तम सांघिक काम, भरपूर सराव आणि तासनतास दिलेला वेळ या सर्वांचे योगदान आहे. त्यामुळे, हा विजय माझ्या संघासाठी आहे.’ ल्यूकला पुण्यात मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पुण्याच्या गर्दीने तो विशेष प्रभावित झाला होता. तो पुढे म्हणाला, ‘आजचा दिवस खरोखरच अप्रतिम होता. मी याआधी कधीही अशी गर्दी पाहिली नव्हती. तिथे किती लोक होते याचा आकडा सांगणे कठीण आहे; पण संपूर्ण मार्गावर प्रचंड लोक होते. रस्त्याच्या कडेला लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि ते दृश्य विलोभनीय होते. सर्वांसमोर शर्यतीत भाग घेणे विलक्षण होते आणि मला आशा आहे की प्रत्येकाने या रेसिंगचा आनंद घेतला असेल. मला पुढच्या वर्षी पुन्हा इथे यायला नक्कीच आवडेल.’

‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’च्या महासंचालक अमिना लानाया म्हणाल्या, ‘भारताचा अभिमान वाटावा असा हा सोहळा होता. पहिल्याच आयोजनात भारताने जागतिक दर्जाची शर्यत यशस्वी करून दाखवली आहे. सायकलिंग हा खेळ भारतीयांच्या मनात क्रिकेटसारखे स्थान मिळवेल, हेच आमचे ध्येय आहे.’ ही स्पर्धा ‘लॉस एंजेलिस २०२८ च्या ऑलिंपिकसाठी रँकिंग पॉइंट्स देणारी असल्याने याला विशेष महत्त्व होते. पुण्याच्या या यशस्वी आयोजनाने भारतात सायकलिंगच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.

विजेत्यांना अभिनेता अमीर खान याच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेच्या (युसीआय) महासंचालक अमिना लानाया, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीतसिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बजाज ऑटोचे कर विभागाचे उपाध्यक्ष चेतन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिनेता अमीर खान याने विजेत्यांचे कौतुक केले. त्याबरोबर ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्वांचेही त्याने अभिनंदन केले.

इ्तर विजेते

पोलका डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स): बर्गोस बर्पेललेट बीएच संघाच्या क्लेमेंट अलेनो

ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलस्वार): बर्गोस बर्पेललेट बीएच संघाच्याच जंबलजाम्ट्स सैनबायर

व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलस्वार): नेदरलँड्सच्या तिज्सेन विगो

ब्लू जर्सी (सर्वोत्कृष्ट भारतीय सायकलस्वार): हर्षवीर सिंग सेखॉन

सर्वोत्तम तीन भारतीय – हर्षवीर सिंग सेखॉन, मानव सारडा, दिनेश कुमार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: