James Laine : Shivshahir Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य;   म्हणाले…! 

HomeBreaking NewsPolitical

James Laine : Shivshahir Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य;   म्हणाले…! 

Ganesh Kumar Mule Apr 17, 2022 1:46 PM

Raj Thackeray on Pune Rain | राज ठाकरे यांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा 
Raj Thackeray : पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या.. : राज ठाकरेंनी सांगितले कारण 
Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट 

बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य;   म्हणाले…!

राज्यात सध्या मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. त्यातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केलं आहे. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली आहे.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर काय आरोप केला होता –

“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

शरद पवारांनी उत्तर देताना काय म्हटलं होतं? –

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळय़ा दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे, असं शरद पवार यांनी म्ह़टलं होतं.

यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जेम्स लेन यांची मुलाखत

जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे.

पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारलं असता जेम्स लेन यांनी सांगितलं की, “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होतं. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही”.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही”.

तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.

बाबासाहेब पुरंदरे तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसं पाहता? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ आदरणीय होते. 18 व्या आणि 19 व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला”.

जवळपास दीड दशकांनंतरही पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या वाचून तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे”.

२००३ मध्ये पेटला होता वाद

२००३ मध्ये जेम्स लेन यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जेम्ल लेन यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत पुण्यातील भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यू़टवर हल्ला केला होता. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने पुस्तकावर बंदी घातली. महाराष्ट्रातील गदारोळानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनेही हे पुस्तक मागे घेतले होते. मात्र या पुस्तकामुळे निर्माण झालेले वाद अद्यापही जिवंत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0