Akhil Bharatiya Sahitya Sammelan | अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

HomeBreaking News

Akhil Bharatiya Sahitya Sammelan | अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

Ganesh Kumar Mule Jan 03, 2025 7:49 PM

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदोन्नती | पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन! | 15 जुलै पर्यंत करता येणार अर्ज
palkhi sohala 2023 | पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी | पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाणून घ्या
Prithviraj Chavan Congress | निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर |  पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Akhil Bharatiya Sahitya Sammelan | अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

 

Murlidhar Mohol – (The Karbhari News Service) – पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजली जाते. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणीवेने, आत्मियता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शिवाय ‘१०० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Sahitya Sammelan) पुण्यात व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Pune News)

सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. सतिश देसाई, शैलेश पगारिया, सचिन ईटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा, साहित्य सेवकांचा सत्कार या प्रसंगी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते.

साहित्य क्षेत्रातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करून मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे महत्त्व मोठे असून प्रत्येकाच्या मनात असलेली कार्यकर्त्याची भूमिका माझ्याही मनात आहे. यातूनच आत्मविश्वासपूर्णतेने साहित्य संमेलनाच्या यशस्वीततेसाठी मी बांधील आहे. पुण्याचा प्रतिनिधी आणि पुण्याविषयी आदरभाव जपत प्रामाणिकपणे चांगले काम करून माझ्या शहराचे नाव जपेन.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषिक उत्सव, भाषेची जत्र असते. हा उत्सव अधिक देखणा करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदरभाव असून त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. दिल्ली येथे होणारे साहित्य संमेलन प्रयोगशीलता आणि नाविन्यतेचा वापर करून संयोजक संजय नहार आणि त्यांचे सहकारी अधिक देखणे करतील.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्लीत संमेलन आयोजित करण्याची संधी सरहद पुणेला मिळाली आहे, याचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या संमेलनामागे मराठी माणूस एक होत आहे ही संकल्पना जपली जात आहे.

शफी पठाण आणि प्रशांत गौमत यांनी माध्यम प्रतिनिधींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार प्रा. मिलिंद जोशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.