मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही
: सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी
पुणे : देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण केलं पण अजित पवार यांना भाषण करू दिले गेले नाही. त्यामुळं यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांना भाषण करायचं होतं, याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण पीएमओकडून लेखी उत्तरात त्यांच्या भाषणाला ओके आलं नाही. हे अतिशय गंभीर असून मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा, पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळं हे अतिशय धक्कादायक आणि अयोग्य आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
देहू येथील पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(@Dev_Fadnavis) यांना बोलण्याची संधी दिली.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks)यांना बोलू दिले नाही.हा महाराष्ट्राचा अपमान आहे
— Supriya Sule (@supriya_sule) June 14, 2022
आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर तिथं भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी फडणवीसांना भाषण करु द्यायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे जे झालं ते अयोग्य असल्याचं माझं मत आहे. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणं लोहगाव विमानतळ ते देहू आणि देहू ते मुंबई या दोन्ही प्रोटोकॉल प्रमाणं अजित दादांना हजर राहणार हा प्रोटोकॉल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
देहू संस्थानने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांचं प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, “हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.