अहमदाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात
: भाजपला सद्बुद्धी मिळो, साबरमतीआधी ‘पुणे दर्शन’ घडो : प्रशांत जगताप
पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बुधवारी – गुरुवारी गुजरातच्या अहमदाबाद दौऱ्यावर जात आहेत. साबरमती व इतर प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु, पुण्यात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना सत्ताधारी भाजपची मंडळी पाहणी दौऱ्यात आणि पुणेकरांना संकटात लोटण्यातच धन्यता मानत आहेत. या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळो व त्यांना साबरमतीआधी पुणे शहरातील समस्यांचे दर्शन घडो, हीच प्रार्थना आम्ही दगडूशेठ गणपतीचरणी करीत आहोत. असा टोला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.
पुण्याचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ, आयुक्त मा. विक्रम कुमार व सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा आखला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराला भेट देऊन या शिष्टमंडळाकडून साबरमती नदी प्रकल्प व इतर प्रकल्पांची पाहणी करण्यात येणार आहे. खरे तर संपूर्ण जगभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून करोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. आंतरराज्य प्रवासावर निर्बंध आणण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे पदाधिकारी मात्र बिनधास्त दौरा आखण्यात व्यग्र आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला कोणतेही कर्तृत्व दाखविता आले नाही. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेच पदाधिकारी पुणेकरांपुढे संकट आ वासून उभे असतानाही फेरफटका मारण्यासाठी निघाले आहेत. साबरमती प्रकल्पाची पाहणी करून तसा प्रकल्प पुण्यात उभारण्याचा घाट घालून पुणेकरांपुढील संकट अधिक गहिरे करतात की काय, अशी शंका आहे.
मुळातच साबरमती प्रकल्पावर पर्यावरणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञ आणि सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी साबरमतीच्या धर्तीवर पुण्यात मुठा नदीवर प्रकल्प उभारल्यास त्यामुळे निर्माण होणारे धोके अधोरेखित केले आहेत. परंतु, केवळ सत्तेत मश्गुल असलेल्या भाजपला त्याचे काही सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे. त्यासाठीच हा पाहणी दौऱ्याचा घाट घातला गेला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांना फेरफटकाच मारायचा असेल, तर त्यांनी संपूर्ण शहरात फेरफटका मारावा. जवळपास सर्वच ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहनधारकांची होत असलेली कसरत, भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या, फ्लेक्स आणि बॅनरबाजीतून झालेले शहराचे विद्रुपीकरण याचे दर्शन या शिष्टमंडळाला घडेल. पुणेकर दररोज कोणत्या समस्यांचा सामना करीत आहेत, ते दिसून येईल. आधी या समस्यांतून पुणेकरांची सुटका करावी व नंतर नवीन प्रकल्पाचा पाहणी दौरा आखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात येत आहे.
COMMENTS