Pallavi Surse | व्यवसायाच्या आमिषाने महिलांना फसविणाऱ्यावर कारवाई करावी | पल्लवी सुरसे
| हडपसर पोलीस स्टेशनला महिलांच्या वतीने दिले निवेदन
Hadapsar Police Station – (The Karbhari News Service) – घरगुती व्यवसायाच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मागणी स्वाभिमानी महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा पल्लवी सुरसे यांनी काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी काँग्रेसचे प्रशांत सुरसे, मारुतीआबा तुपे, दत्ता खवळे, नंदकुमार आजोतीकर, हसमुखसिंग जुनी, विजय देशमुख, आदी उपस्थित होते.
सुरसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कृष्णप्रिया महिला मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था संचलित भेकराईनगर येथील खुशी गृह उद्योग समूहचे प्रमुख बाबाराजे कोळेकर याने महिलांना घरगुती व्यवसाय म्हणून पेन्सिल, पापट, रबर, शेंगदाणा लाडू असे व्यवसाय गरी करून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी प्रत्येक महिलांकडून दोन हजार ५० रुपये आणि ओळखपत्र घेतले. सुरुवातला काही महिलांना त्याने लाभही दिला. मात्र, त्यानंतर कोळेकर याने संपर्क बंद केला. वारंवार संपर्क करून त्याच्याकडे व्यवसाय द्या नाही, तर आमचे पैसे द्या असा तगादा लावला. त्यावेळी त्याने निवडणूक झाल्यानंतर पैसे देतो असे सांगितले. मात्र, आता त्याचे कार्यालयही बंद आहे, फोन उचलत नाही. त्याने परिसरातील महिलांची मोठी फसवणूक केली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच महिलांचे कष्टाचे पैसे परत मिळवून द्यावे असे सुरसे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी महिलांचे म्हणणे ऐकून जबाब नोंदवून घेतले. तात्काळ कारवाई करून कोळेकर याला अटक करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सुरसे यांनी सांगितले.
COMMENTS