पुणे शहराच्या विकासाला गती द्या
| आमदार माधुरी मिसाळ यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती
पुणे| महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात पुणे शहराच्या विकासाला खीळ बसली असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालावे. अशी विनंती आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.
मिसाळ म्हणाल्या, ‘राज्यात भाजपचे सरकार असताना शहराच्या आठही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी किमान एक मोठा प्रकल्प फडणवीस यांनी मंजुरी देऊन कामाला गती दिली होती. त्यामध्ये पुणे मेट्रो, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना, समान पाणीपुरवठा योजना, चांदणी चौकातील उड्डाणपूल, स्वारगेट येथील मल्टिट्रान्सपोर्ट हब, पुरंदर विमानतळ, कात्रज-कोंढवा रस्ता अशा विविध विकासकामांचा समावेश होता. परंतु गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारची राजकीय उदासिनता आणि आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या प्रकल्पांची गती मंदावली आहे. त्याला गती देण्याची आवश्यकता आहे.’
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट 23 गावांसह पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रलंबित विकास आराखड्यातील त्रुटी दुरूस्त करून त्याची पुननिर्मिती करणे, अग्निशमन दलाच्या सेवा प्रवेश नियमावलीला मान्यता देणे, पुणे मेट्रोला स्पेशल पर्पज प्लॅनिंग ऑथोरिटी मंजुरी द्यावी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रलंबित नियमावलीला मान्यता द्यावी यासाठी बैठक आयोजित करावी अशी विनंती ही मिसाळ यांनी केली आहे. गंगाधाम चौकात ग्रेड सेपरेटरसह उड्डाण पूल, हिंगणे खुर्द येथे पोलीस स्थानक आणि पोलीस चौकी आणि पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे ही पत्रात म्हटले आहे.