पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे
| अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
पुणे | ” पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन आहे. महान व्यक्तिमत्वही वाचनातूनच घडलेली आहेत. आपला वाचनाचा वेग विवेकानंदांप्रमाणे असावा. वाचनासाठी बैठक ही महत्त्वाची आहे.आपण वाचन केलेल्या साहित्यकृतीचे आपण चिंतन मनन केले पाहिजे.” असे प्रतिपादन प्रा. डॉ वसंत गावडे यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर, ता-जुन्नर,जि-पुणे. येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ,भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” विविध उपक्रम राबवून मोठ्या आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. “वाचनाचे महत्त्व” या विषयावरील ‘घोषवाक्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.
“डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा “याचे उद्घाटन प्राचार्य उपप्राचार्य व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “काव्यवाचन” स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. तसेच “वाचनाचे महत्त्व” या विषयावर प्रा डॉ.वसंत गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
ग्रंथालय विभागाच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना पुस्तक परीक्षणासाठी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व देशासाठी महान कार्य करणाऱ्या विभूतींची पुस्तके देण्यात आली.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे म्हणाले,” वाचन हे आपले जीवन समृद्ध करते.अर्थपूर्ण वाक्य बोलण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. आजच्या युवकांनी मोबाईलला प्राधान्य न देता वाचनाला प्राधान्य द्यावे. वाचनामुळे आपल्याला ज्ञान संपादन करता येते.आपण काय वाचतो यावर आपले व्यक्तिमत्व ठरते.चांगले विचार आपल्याला फक्त वाचनातूनच मिळतात.”
प्रा.डॉ. वसंत गावडे आपल्या विशेष व्याख्यानात म्हणाले,” पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन आहे. महान व्यक्तिमत्वही वाचनातूनच घडलेली आहेत. आपला वाचनाचा वेग विवेकानंदांप्रमाणे असावा. वाचनासाठी बैठक ही महत्त्वाची आहे.आपण वाचन केलेल्या साहित्यकृतीचे आपण चिंतन मनन केले पाहिजे.”
प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. निलेश हांडे म्हणाले,” आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचा विकास करून पुढच्या पिढीला हा समृद्ध ठेवा दिला पाहिजे. ग्रंथालये ही ज्ञानाचे साठे आहेत. आजचा विद्यार्थी मोबाईलच्या युगातही वाचन करतो. पण ते वाचन तुकड्या तुकड्याचे न होता पुस्तकाच्या माध्यमातून सलग होणे व टिपण तयार करणे हे महत्त्वाचे आहे.” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील अनेक प्रसंग डॉ.हांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. ”
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे उपप्राचार्य डॉ. व्ही. एम.शिंदे,उपप्राचार्य.डॉ.के.डी सोनावणे उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सुनील लंगडे डॉ. विनायक कुंडलिक, डॉ. किशोर काळदंते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.छाया तांबे व आभार प्रा. रोहिणी मदने यांनी मानले.