Ferguson College | फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

Homeपुणेsocial

Ferguson College | फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

Ganesh Kumar Mule Sep 14, 2022 10:46 AM

Ganesh Jayanti | माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल | नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
Pimpari Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयासाठी 15 एकर भूसंपादनाचा शासननिर्णय निर्गमित
Guardian ministers | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री | नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

| विद्यार्थ्यांना मिळणार वाहतुकीचे धडे आणि शिकाऊ परवाना

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात परिवहन विभागातर्फे ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारे फर्ग्युसन राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कक्षाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळू शकणार आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘वाहन चालन परवाना मिळविणे आता सोपे झाले असले, तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. भारतात लोक वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात. परदेशात वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असणे आवश्यक आहे.’’

वाडकर म्हणाले, ‘‘छोट्या-छोट्या चुकांमुळे अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.’’ प्राचार्य डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, नेहा जाधव, शिक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शुभांगी येवले यांनी आभार प्रदर्शन केले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे प्रतिक म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले.